नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : राज्यसभेत महिला खासदारांसह अन्य खासदारांना मारहाण केल्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. गुरुवारी विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढून सत्ताधारी पक्षाचा निषेध केला.
यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. बाहेरून आलेल्या लोकांनी खासदारांना मारहाण केली, असे पहिल्यांदाच घडले, असेही ते म्हणाले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी संपले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
विजय चौक येथे आल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली '
आम्ही पेगॅससचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती.
आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावं लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे,' असा आराेपही त्यांनी केला.
'संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले होते. तरीही, ते अध्यक्ष रडल्याचे सांगतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे, रडणे नव्हे.' असेही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, 'काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला. हा देशाचा अपमान आहे.'
या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'बाहेरून लोकांना संसदेत आणले. त्यांनी मार्शलचे कपडे घातले होते. त्यांनी महिला खासदारांवर हल्ला केला.
ही लोकशाहीची हत्या आहे. ती दररोज होत आहे. असे वाटले की मी संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभा आहे.'
या आंदोलनात समाजवादी पक्षासह अन्य विरोधी पक्षाचे नेतेही उपस्थित होते.
दरम्यान आज विरोधी नेते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.
राज्यसभेत मारहाण प्रकरण तापले असतानाच त्याप्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली आहे.
हेही वाचलं का?