

HC On Acid Attack: गुजरात उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात अॅसिड हल्ला करणाऱ्या महिलेची १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा रद्द केली. या महिलेवर अहमदाबादमधील एका बस कंडक्टरवर अॅसिड हल्ला केल्याचा आरोप होता. तिला खालच्या कोर्टाने १० वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय बदलला असून हा अॅसिड हल्ल्यातील हल्लेखोर महिलेने बुरखा घातला होता. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता म्हणून उच्च न्यायालयाने आरोपी महिलेच्या याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत तिच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
जस्टिस विमल के व्यास यांनी महेजबीनबानू छुवरा यांना मोठा दिलासा दिला. त्यांनी या प्रकरणाच्या तपासात अनेक विसंगती असून तपास यंत्रणेला हल्लेखोराने घातलेले कपडे आणि ग्लोज शोधून काढण्यात अपयश आल्याचा दाखला दिला.
४२ वर्षाच्या या महिलेला अहमदाबाद सत्र न्यायालयाने राकेश ब्रम्हभट (वय ५१) या बस कंडक्टरवर अॅसिड हल्ला केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. महेजबीनबानू यांनी राकेश यांच्यावर हा हल्ला द्वेश आणि मत्सर भावनेतून केला होता. राकेशने तिच्यासोबतचे नाते तोडल्यामुळं तिने हा हल्ला केला होता. या प्रकरणी तिला १० वर्षाचा तुरूंगवास आणि १ लाखाचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता.
याच्याविरूद्ध महेजबीनबानूने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने याचिकार्त्या महिलेची या प्रकरणाच्या तपासात ओळखच स्थापित होत नाही. सरकारी वकिलांना या महिलेची ओळखच सिद्ध करता आलेली नाही. त्यांनी फक्त शंकेच्या आधारावर संबंधित व्यक्तीने हे कृत्य केलं असल्याचा दावा केला.
सरकारी वकिलांनी राकेश ब्रम्हभट्ट यांच्यावर २७ जानेवारी २०२४ च्या रात्री ८.३० च्या सुमारास हल्ला झाल्याचे म्हटले होते. त्यावेळी राकेश हे एमटीएस कंट्रोल केबिन क्रमांक ७ मध्ये होते. सरकारी वकिलांच्या मते मेहजबीन बानू आणि तिचा मित्र मीत शर्मा हे राकेश यांच्याकडे आले. मीत शर्माने त्याच्याजवळील प्लास्टिक कॅन ज्याच्या अॅसिड होते ते महेजबीन बानूकडे दिले.
त्यानंतर मेहजबीन बानूने राकेश ब्रम्हभट्ट यांच्या अंगावर फेकले. त्यावेळी महेजबीन बानू यांनी तू माझ्यासोबत संबंध का ठेवणार नाहीस असं म्हटल्याचाही दावा करण्यात आला. यानंतर आरोपी तिथून पळून गेले. ब्रम्हभट्ट यांना या हल्ल्यात डोळ्याला इजा झाली. तसेच पाठ आणि प्रायव्हेट पार्टला देखील इजा झाली.
मात्र उच्च न्यायालयाने ज्या व्यक्तीने हल्ला केला अन् तेथून पळून गेली ती व्यक्ती ही महेजबीन बानू छुवाराच होत्या हे स्पष्टपणे सिद्ध होत नाही. तुम्हाला फक्त एक बुरखा घातलेली महिला केबिनपासून कानपूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळताना दिसत आहे. त्या व्यक्तीचा चेहरा दिसतच नाहीये.
विशेष म्हणजे ब्रम्हभट्ट यांनी देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ही बुरख्यातील व्यक्ती पुरूष आहे किंवा महिला हे देखील सांगता आले नव्हते. ब्रम्हभट्ट यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीचा चेहरा दिसत नाही हे देखील मान्य केलं होतं. तसेच पोलीसांना तपास करताना आरोपीने घातलेले ग्लोज देखील मिळालेले नाहीत.
त्यामुळे न्यायालयाने, 'प्रथम दर्शनी असं दिसतंय की तपास अधिकारी इश्वरभाई गमित यांनी आरोपीने त्यावेळी घातलेले कपडे आणि ग्लोज देखील ताब्यात घेतले नाहीत. याचबरोबर ज्यामधून अॅसिड आणलं गेलं तो प्लास्टिक कंटेनर देखील पोलिसांना मिळवता आलेला नाही. तसेच ब्रम्हभट्ट आणि महेजबीन बानू यांचे रिलेशनशिप देखील सिद्ध करता आलेलं नाही. त्याबाबतचे व्हॉट्स अॅप मेसेज, चॅट, फोटोग्राफ किंवा कॉल रेकॉर्ड देखील पोलिसांना सादर करता आलेले नाहीत याकडे देखील कोर्टाने लक्ष वेधलं.