

Abhijeet Dipke Stop Protest: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि त्याच्या साथीदारांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केलं होतं. मात्र आता या आंदोलनाला ब्रेक लावण्यात आला आहे. अभिजीतने १६ मिनिटांचा मोठा व्हिडिओ टाकून सौरभ आणि आशुतोष रांका हे जेलमध्ये गेल्यानंतर कायदेशीर येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत कॉकरोच अर्थात तरूणांना सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला आहे. अभिजीतचे सौरभ आणि आशुतोष यांच्याबाबत बोलताना डोळे पाणावले होते.
अभिजीत दिपकेंनी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानंतर आपले स्कूल ठीक करो हे आंदोलन थांबवून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोहीम उघडली. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे देखील तो म्हणाला होता.
मात्र नुकतेच सीजेपीच्या नेत्यांना कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना जंतर मंतरवर झेंडा फडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. त्यानंतर आज दिपकेने १६ मिनिटांचा व्हिडिओ मेसेज शेअर केला. या व्हिडिओचा गोशवारा काढला तर सध्या आंदोलनाला ब्रेक लावण्यात आला आहे हे स्पष्ट होते. दिपकेने तरूणांना कुटुंबासोबत सण साजरा करण्यास सांगितलं आहे.
अभिजीत या व्हिडिओत म्हणतो की, 'मी पाहतो आहे की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सर्व संघर्ष करत आहात. तुम्ही लोकांनी खूप काही सहन केलं आहे. संपूर्ण सिस्टम तुम्हाला सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मी नशीबवान आहे की तुमच्यासारखे लोक निःस्वार्थीपणे संघर्ष करत आहेत आणि माझ्यासोबत आशुतोष, सौरभ याच्या पाठीमागे उभे आहेत.
मला तुम्हाला सर्वांना एकच आवाहन करायचं आहे की गेले काही दिवस आमच्यासाठी सोपे नव्हते. मी पूर्वीपासून सांगत होतो की गोष्टी अवघड होत जाणार आहेत. आता आपल्याला सहजासहजी काही करू देणार नाहीयेत. तसंच होत आहे. काही दिवसातच आपल्या मागे पोलीसांचा ससेमिरा लागणार आहे असं म्हणालो होतो. त्याप्रमाणेच झालं. ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच झालं आहे. हे सर्व माहिती असून देखील तुम्ही ज्या प्रकारे हिम्मत आणि एकतेने लढत आहात ते कौतुकास्पद आहे. मी तुम्हाला सलाम करतो आणि धन्यवाद देतो.
अभिजीतने गेल्या १० ते १२ दिवसांपासून जे काही झालं त्यामुळं लोकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्यामुळे काही काळ त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. दिपके म्हणाला, सौरभ आणि आशुतोषसाटी जेवढ्या गोष्टी अवघड आहेत तेवढ्याच त्या तुमच्यासाठी देखील आहेत. अनेक लोकांना रस्त्यावर मारण्यात आलं आहे. डिटेन केलं गेलं आहे. हे आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबीयांसाठी अवघड आहे. हा निर्णय त्यांचा नाही तर आपला होता. मी सर्व कॉकरोचना आवाहन करतो की त्यांनी काही दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवावेत. सणाचे दिवस आहेत. सौरभ आणि आशुतोष यांच्यासह तुमचे कुटुंबीय देखील चिंतेत असतील. काही दिवस कुटुंबासोबत आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत रहा.'