

Abhijeet Dipke Lawrence Bishnoi tweet : 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांचे एक डीसीपी पत्रकार परिषदेदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख 'साहब' असा करताना दिसत आहेत. यावरून त्यांनी, पोलीस कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांशी ज्या प्रकारे वागतात, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले असून, हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा आणि केवळ 'जिभेवरून निसटलेला शब्द' (slip of tongue) असल्याचा दावा केला आहे.
अभिजित दिपके यांनी सोमवार (१९ ऑक्टोबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, "‘लॉरेन्स बिश्नोई साहब’... दिल्ली पोलिसांच्या मनात गुंडांबद्दल किती आदर आहे, हेच यावरून दिसून येते. हक्कासाठी आणि विरोधासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना जर पोलिसांनी याच्या १० टक्के जरी सौजन्याची वागणूक दिली असती, तरी खूप झाले असते."
दिपके यांनी आणखी एका पोस्टमध्ये म्हटले की, "विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांना रोखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. सरकार आणि पोलिसांचे प्राधान्य नेमके कशाला आहे, हेच या घटनेवरून स्पष्ट होते."
दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेचा आहे. व्हिडिओत संबंधित पोलीस अधिकारी म्हणताना ऐकू येत आहेत की, "बघा, या गोष्टीची पुष्टी मी स्वतः करू शकत नाही. पण जो फोन आला होता, त्यामध्ये 'लॉरेन्स बिश्नोई साहब' असे नाव घेण्यात आले होते."
हा व्हिडिओ वेगाने पसरल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले की, "हा व्हिडिओ जुना असून, संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडातून तो शब्द नकळत उच्चारला गेला होता ('स्लिप ऑफ टंग')." दरम्यान, या व्हिडिओमधील संबंधित अधिकारी आता पदोन्नती मिळवून अतिरिक्त पोलीस आयुक्त झाले आहेत.