बी. एस. येडियुरप्पा यांना हटविताना भाजप सावध; राजीनामा लवकरच | पुढारी

बी. एस. येडियुरप्पा यांना हटविताना भाजप सावध; राजीनामा लवकरच

बेंगलोर, पुढारी ऑनलाईन: कर्नाकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा घेण्याआधी भाजप अगदी सबुरीने घेत आहे.

२०११ मध्ये येडियुरप्पा यांना हटवितांना फारसा विचार न करणाऱ्या भाजपने आता सावध भूमिका घेतली आहे.

यामागचे कारण आहे ते लिंगायत समाजाची मते. आगामी निवडणुकीत ही मते भाजपपासून दुरावू नयेत यासाठी भाजप येडियुरप्पा यांच्या अटी मान्य करत असल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा: 

इंदिरा गांधी, सोनिया गांधी लोकसभेवर निवडून देत नेहमीच साथ देणाऱ्या कर्नाटकात काँग्रेसने मोठी चूक केली होती. त्याची किंमत आजही हा पक्ष चुकवत आहे.

सध्या कर्नाटकात लिंगायत समजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

अधिक वाचा:

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे या समाजाचे नेते आहेत. तसेच अन्य समाजातील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. पक्षावर पकड असलेले नेते अशी त्यांची ओळख आहे.

लिगायत समाज हा कर्नाटकातील राजकारणावर प्रभाव ठेवतो. १९५६ ते १९६९ पर्यंत कर्नाटकात काँग्रेसची सलग सत्ता होती. त्यावेळी लिंगायत समाजाचे नेते मुख्यमंत्री होते.

इंदिरा गांधी यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी यांना कर्नाटकातील राजकारणाची पुरेशी ओळख झाली नव्हती.

त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील आणि त्यांचे फारसे पटले नव्हते.

अधिक वाचा:

‘या’नेत्याला विमानतळावरून बाहेर काढण्याचे आदेश

पाटील हे दिल्लीला भेटीसाठी येत असताना त्यांना विमानतळावरून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अपमानित झाल्याची भावना लिंगायत समाजात होती. पाटील हे कर्नाटकातील मातब्बर नेते होते.

त्यांनी २२४ पैकी १८४ जागांवर विजय मिळविला होता, तरीही काँग्रेस नेतृत्व त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागले ते पाहता लिंगायत समाज दुखावला होता.

त्यामुळे पुढे दोनेवेळा सत्तेत येऊनही लिंगायत समाज काँग्रेसच्या जवळ गेला नाही.

अडवाणींनीही केली होती चूक

२०११ मध्ये भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाल्याने येडियुरप्पा यांचे पद धोक्यात आले होते.  कर्नाटकातील जातीय राजकारणाचा अभ्यास न करता येडियुरप्पा यांना अडवाणी यांनी हटविले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी दुसरा पक्ष काढला.

२०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत येडियुरप्पा यांनी १० टक्के मते घेऊन ६ आमदार निवडूण आणले होते. त्यामुळे तेथे काँग्रेसची सत्ता आली आणि भाजपला विरोधात बसावे लागले होते.

मोदी-शहा सावध

येडियुरप्पा आणि लिंगायत समाजाचे राजकारण पुरते माहीत असल्याने भाजप आता ताकही फुंकून पित आहे. ७८ वर्षीय येडियुरप्पा यांना सन्मानाने निवृत्त करायचे असा प्लॅन ठरला आहे.

त्यामुळे येडियुरप्पा यांनी ठेवलेल्या अटींबाबत गंभीरपणे चर्चा सुरू आहे. एका मुलाला केंद्रात मंत्रिपद तर दुसऱ्याला राज्यात मंत्रिपद मिळायला हवे.

तसेच मी सांगेन त्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले पाहिजे, अशा अटी येडियुरप्पा यांनी घातल्या आहेत.

त्यामुळे येडियुरप्पा यांचे लाड पक्ष पुरवतो की, मोदी आणि शहा यांची कार्यपद्धती अवलंबतो याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचलेत का:

पाहा व्हिडिओ : शेवंतासाठी १२ किलो वजन वाढवावे लागले

Back to top button