महाविकास आघाडी सरकार : काँग्रेस बाहेर पडल्यास भाजपचा बाहेरून पाठिंबा? | पुढारी

महाविकास आघाडी सरकार : काँग्रेस बाहेर पडल्यास भाजपचा बाहेरून पाठिंबा?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार मध्ये धुसफुस सुरू असल्याची राजकीय वर्तृळात चर्चा आहे.

त्यातच भविष्यात आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडल्यास संभाव्य शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची चाचपणी भारतीय जनता पक्ष करीत असल्याची माहिती शनिवारी सूत्रांनी दिली.

भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दीर्घकाळ भेट घेत खलबते केली. या भेटीदरम्यान सदर मुद्द्यावर खल झाला असल्याचे समजते.

राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारमधला विसंवाद वाढत चालला आहे.

अधिक वाचा :

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.

याशिवाय आपल्यावर ‘वॉच’ ठेवला जात असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

दुसरीकडे पटोले यांच्या वक्तव्यांना आपण फार महत्त्व देत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली होती.

आगामी काळात काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर अशा स्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारला पाठिंबा दिला जाऊ शकतो का, यावर शहा यांनी खल केला असल्याचे समजते.

राष्ट्रपती निवडणुकीचाही अँगल…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पुढील वर्षी संपत आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांना या निवडणुकीचेही वेध लागले आहेत.

मध्यंतरी विरोधकांकडून शरद पवार यांना मैदानात उतरवले जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. तथापि अशा चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते.

केंद्रात तसेच विविध राज्यांमध्ये भाजपचे सरकार सत्तेत असल्याने या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार निवडून येणे सहज शक्य असले तरी निवडणुकीपूर्वी आघाडीची बाजू जास्तीत जास्त मजबूत करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.

त्याच दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील सत्तेतून काँग्रेस बाहेर पडल्यास सेना-राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देण्याची खेळी भाजप खेळू शकते.

अधिक वाचा :

Back to top button