येडियुरप्पा यांचा दोन दिवसांत राजीनामा ? | पुढारी

येडियुरप्पा यांचा दोन दिवसांत राजीनामा ?

बेंगलोर, पुढारी ऑनलाईन:  कर्नाटकात कुमारस्वामी सरकारला हादरा देऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटविण्याच्या जोरदार हालचाली कर्नाटकात सुरू झाल्या आहेत. ते येत्या दोन दिवसांत राजीनामा देण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा:

बी. एस. येडियुरप्पा यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. मात्र, आपण विकासकामांबाबत चर्चा केली असून राजीनाम्याचा प्रश्न येत नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

कर्नाटक भाजपमध्ये काही नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्या कामकाजावर नाराज आहेत. त्यांनी थेट येडियुरप्पा यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने या नेत्यांना इशारा दिला आहे.

अधिक वाचा:

मात्र, तरीही आरोप सुरुच आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदल व्हावा अशी मागणी हे नेते करत आहेत.

कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांनी कुमारस्वामी सरकार पाडले होते. काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये गेल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपचा वरचष्मा राहिला होता. त्यामुळे येडियुरप्पा यांची खूर्ची मजबूत असल्याची चर्चा होती.

मात्र, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी मतभेद, मुलाचा कारभारात हस्तक्षेप आदींमुळे ते वादात सापडले होते. दरम्यान येडियुरप्पा यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले होते.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटी घेतल्या.

अधिक वाचा:

येडियुरप्पा यांची खुर्ची डळमळीत झाल्याने या भेटीगाठी होत्या असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, मी पंतप्रधानांसह सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मेकेदातू प्रकल्पासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली.

ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा दिल्लीला जाणार आहे. राज्यात भाजप मजबूत असून, पुन्हा एकदा भाजपचेच सरकार बनेल,’ असा दावाही त्यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा:

राजीनामा का?

मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे सध्याचे वय ७८ आहे. प्रकृती आणि वय लक्षात घेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. भाजपमध्ये ७५ वयाच्या वर पद देऊ नये असा मतप्रवाह आहे.

येडियुरप्पा यांचा दाखला देत अनेक नेते दावा करू शकतात. ती पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे पक्षश्रेष्ठींनी त्यांना सुचविले आहे. मुलाला केंद्रात मंत्रिपद मिळणार असेल तर राजीनामा देऊ, अशी अट त्यांनी घातल्याचेही समजते.

मात्र, पक्षश्रेष्ठींनी एक ते दोन दिवसांत राजीनामा देण्याचे निर्देश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोण होणार मुख्यमंत्री ?

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. केंद्रात मंत्री असलेले प्रल्हाद जोशी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष या दोघांच्या नावाची चर्चा असल्याचे समजते.

जोशी हे उत्तर कर्नाटकातून खासदार आहेत. तसेच संतोष हे भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत.

हेही वाचलेत का?

 

पहा व्हिडिओ: व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या भाईला पोलिसांचा हिसका

Back to top button