दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव | पुढारी

दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ‘नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यावरुन पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. त्यांनी ‘नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर घेराव घालू आणि त्यांना घराबाहेर पडून देणार नाही.’ असे वक्तव्य केले.

दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात विमानतळ नामकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे अर्जूनबुवा चौधरी, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे संतोष केणी , कॉम्रेड कृष्णा भोयर, रवी भिलाने लाल बावटा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर अडी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा :

आगरी समाजाची मागणी

अनेक दिवस नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आगरी व इतर समाज तसेच विविध पक्षांकडून केली जात आहे. दुसरीकडे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा आग्रह शिवसेनेतर्फे धरण्यात आला आहे.

यासंदर्भात १५ दिवसापूर्वी आगरी व इतर समाज तसेच विविध पक्ष मिळून नवी मुंबई येथील सिडको येथे मोठे आंदोलन केले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करणाऱ्या सिडको प्रशासनाचा तीव्र शब्दात यावेळी निषेध करण्यात आला.

अधिक वाचा :

बाळासाहेबांनीही दि बा पाटली यांचेच नाव दिले असते

जगदीश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की ‘आत्तापर्यंत महाराष्ट्रात १९ मुख्यमंत्री होऊन गेले परंतु एकाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव कोणत्याही प्रकल्पाला दिले नाही. मात्र हे एकमेव मुख्यमंत्री वडिलांचे नाव देण्यासाठी झटत आहेत’

ते पुढे म्हणाले की, ‘स्वतः बाळासाहेब आज जिवंत असते तरीही त्यांनी दि वा पाटील यांचेच नाव देण्यासाठी आग्रह धरला असता.’

पंतप्रधानांनाही भेटणार 

गायकवाड यांनी नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी ३० जुलैच्या आधी पारंपरिक वेशात दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडू देणार नाही अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी केला.

हेही वाचले का?

Back to top button