दानिश सिद्‍दीकी : हिंसाचाराची भयावहता दाखवणारा फोटोग्राफर | पुढारी

दानिश सिद्‍दीकी : हिंसाचाराची भयावहता दाखवणारा फोटोग्राफर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘आरसा खोटे बोलत नाही’, हे जसं वैश्‍विक सत्‍य आहे. तसेच फोटोही तुम्‍हाला वास्‍तव आणि खरं जग दाखवतो. हेच खरं जग आणि वास्‍तव परिस्‍थिती जगासमोर आणण्‍याचा ध्‍यास एका वृत्तछायाचित्रकारास होता. तो जगलाही तसच आणि वास्‍तवाचा वेध घेताना तो आपल्‍यातून निघूनही गेला. दानिश सिद्‍दीकी असे त्‍यांचे नाव.

Danish Siddiqui

पुलित्‍झर पुरस्‍कार विजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिददीकी यांचा अफगाणिस्‍तानमध्‍ये तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलामधील संघर्षात मृत्‍यू झाला. खर तर दहशतवाद्‍यांनी दानिश यांची हत्‍याच केली. कारण यापूर्वी त्‍यांनी युद्‍धभूमीवर जावून येथील हिंसाचार आणि होरपळेल्‍या जीवांची तडफड आपल्‍या फाेटाेमधून जगासमोर आणली होती.

दानिश यांनी आपल्‍या करीअरची सुरुवात वृत्तवाहिनी बातमीदार म्‍हणून केली. मात्र छंद होता फोटोग्राफीचा. बातमीदारी करताना ते काही फोटोही टिपत असत. त्‍यांचे फोटो केवळ एक हजार नव्‍हे तर एक लाख शब्‍द बोलत असत, असे त्‍यांचे तत्‍कालिन सहकारी सांगतात. सातत्‍याने सत्‍याचा शोध घेण्‍याच्‍या वृत्ती आणि फोटोग्राफीचा छंद यामुळे त्‍यांनी वृत्तछायाचित्रकार होण्‍याचा निर्णय घेतला. रॉयटर्स या वृत्तसंस्‍थेमध्‍ये त्‍यांची निवड झाली आणि त्‍याचा वास्‍तव टिपण्‍याचा प्रवास अधिक वेगावला.

वास्‍तवला झाकून खोटेपणा दाखविणार्‍या जगात दानिश हे सत्‍य शोधत होते. प्रवाहाविरोधात पोहताना त्‍यांनी आपला सत्‍य टिपण्‍याचा ध्‍यास सोडला नाही. त्‍यांची निरीक्षण शक्‍ती खूपच सखोल होती. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या प्रत्‍येक फोटोत एक ‘स्‍टोरी’ दडलेली असे. दिल्‍ली दंगल असो की कोरोनाची महामारी त्‍याने देशासमोर आणि जगासमोर वास्‍तव मांडले, असे त्‍यांचे सहकारी सांगतात.

मागील दीड वर्षांमध्‍ये देशातील महत्‍वपूर्ण घटनांच्‍या कव्‍हरेजमध्‍ये त्‍याने केलेली फोटोग्राफी नेहमीच दोन पावले पुढे होती.

२०१८ मध्‍ये पुलिज्‍झर पुरसकाराने गौरव

यापूर्वी अफगाणिस्‍तानमध्‍ये लढाईचे छायाचित्रे घेण्‍यासाठी युद्‍धभूमीवर गेलेल्‍या दानिश यांच्‍या खाद्‍याला दुखापत झाली होती. २०१८ मध्‍ये त्‍यांनी पत्राकिरतेला दिलेल्‍या योगदानाबद्‍दल पुलिज्‍झर पुरस्काराने गौरविण्‍यात आले होते. रोहिंग्‍याबद्‍दल त्‍यांनी केलेल्‍या वृत्तछायाचित्रांसाठी हा गौरव करण्‍यात आला होता.

दिल्‍ली दंगल आणि कोरोना महामारी…

दिल्‍लीत झालेल्‍या दंगलीवेळी एकाला जमाव अमानूषपणे मारहण करीत होता. यावेळी धाडसाने दानिश येथे गेले. फोटो टिपले. त्‍यांना पकडण्‍यासाठी जमावाने त्‍यांचा पाठलाग केला. ते जमावाचा तावडीत सापडले असते तर काही खैर नव्‍हती. प्रसंगावधान दाखवत त्‍यांनी जमावाच्‍या तावडीतून स्‍वत:ची सुटका केली. यानंतर त्‍यांनी आपल्‍या फोटोमधून दिल्‍ली दंगलीची भीषणता जगासमोर आणली.

देशात कोरोनाची महामारीने हाहाकार पसरवला. याचे भयावह वास्‍तव दानिश यांनी कॅमेर्‍याबद्‍ध केले. खरंच कोरोना जिवंत असणार्‍यांनही मारतो आणि मागे उरलेल्‍यांना मनाने संपवतो, हे वास्‍तव दानिश यांनी बिहारमधील एका हॉस्‍पिटलमध्‍ये घेतलेल्‍या फोटोने सर्वांना सांगितले.  त्‍यांनी कोरोना महामागीरचा टिपलेला प्रत्‍येक फोटो हा व्‍यवस्‍था आणि भयावह परिस्‍थितीवर अचूक भाष्‍य करणारा होता.

मृत्‍यू अरिहार्य; पण तो समूहाने आला तर. हा कल्‍पनेनेच काेणाचाही थरकाप उडेल. कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटीत हजारो रुग्‍ण जगण्‍याची लढाई हरले. दिल्‍लीतील स्‍माशनभूमीत मृतदेहाचे खच जमले. दानिश यांच्‍या चिता पेटलेल्‍या फोटोने भारतातील कोरोनाची दाहकताच जगासमोर आणली.

दिल्‍ली दंगलीत एकाला जमावाकडून होणारी मारहाण असो की कोरोना वॉर्डमध्‍ये एकाच बेडवर ऑक्‍सिजन मास्‍क लावले दोन रुग्‍ण उपचार घेत असो. दानिश यांनी आपल्‍या फोटोतून वास्‍तव जगासमोर आणले. यासाठी ते कोणताही धोका पत्‍करण्‍यास तयार असत.

युदध आणि हिंसाचाराची भयावहता त्‍यांनी जगाला दाखवली

दानिश हे ११ जुलै रोजी अफगाणिस्‍तानला पोहचले. त्‍यांनी निर्भिडपणे युद्‍धभुमीवर आपले कर्तव्‍य बजावले. दानिश हे सत्‍य टिपत असतानाच सुरक्षा दल आणि तालिबानी दहशतवाद्‍यांची चकमक झाली. यावेळी लागलेल्‍या गोळीत त्‍यांचा मृत्‍यू झाला. दहशतवाद्‍यांनी एका फोटोग्राफरची हत्‍याच केली.

निर्भिडपणे सत्‍य जगासमोर मांडण्‍यासाठी दानिश यांनी प्राणाची आहुती दिलेय. त्‍याच वारसा जपणार्‍यांवर आता जगण्‍यातलं वास्‍तव जगासमोर समोर आणण्‍याची जबाबदारी आहे. दानिश सिद्‍दीकी हे यापुढे कार्यरुपी असणार नाहीत; पण त्‍याचे फोटो वास्‍तवाची भाषा बोलत राहतील. येणार्‍या पिढी दानिश यांना हेच सांगायचे होते. ते आता त्‍यांचे फोटो सांगतील.

Back to top button