पुढारी ऑनलाईन : लाल किल्ला आमच्या पूर्वजांचा असून तो माझ्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करणारी मुघल वंशाजाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका दाखल करण्यात १५० वर्षं का लागली, असा प्रश्न विचारत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
सुलताना बेगम यांनाी ही याचिका दाखल केली होती. शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्या त्या वंशज आहेत. बहादूर शाह जफर यांचे वंशज मिर्झा बख्त यांच्या त्या पत्नी आहेत. मिर्झा यांचे निधन १९८० ला झाले आहे.
सुलताना बेगम यांनी याचिकेत म्हटले आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५७ला लाल किल्ला ताब्यात घेतला. त्यामुळे आमच्या मालमत्तेच्या हक्कावर गदा आली. त्यामुळे लाल किल्ला पुन्हा आमच्या ताब्यात देण्यात यावा.
न्यायमूर्ती रेखा पिल्लई यांनी ही याचिका फेटाळून लावली. गेल्या १५० वर्षांत या संदर्भात काहीच प्रयत्न का झाले नाहीत, असे म्हणत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली. बेगम या अशिक्षित असल्याने त्यांनी वेळेत याचिका दाखल केली नव्हती, अशी बाजू याचिकाकर्त्यांनी मांडली.
बेगम यांनी कोणतीही वंशावळ दिलेली नाही. बहादूर शाह जफर यांचं १८५७च्या युद्धानंतर काय झालं ते सर्वांना माहिती आहे, त्यांच्या वंशजांनी लाल किल्ला परत मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता बेगम सुलताना अशी मागणी करू शकतात का, असा प्रश्नही उच्च न्यायालयाने विचारला.
हेही वाचलत का?