ओमायक्रॉन : विदेशातून आतापर्यंत ७५० प्रवासी नागपुरात दाखल; मेयो, मेडिकलमध्ये स्‍वतंत्र कक्ष सुरू करणार

ओमायक्रॉन : विदेशातून आतापर्यंत ७५० प्रवासी नागपुरात दाखल; मेयो, मेडिकलमध्ये स्‍वतंत्र कक्ष सुरू करणार
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सूचना नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ओमायक्रॉन विषाणूपासून संभाव्य धोक्याच्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय टास्क फोर्सचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या डॉ. श्रीमती तायडे, आरोग्य उपसंचालक संजय जैस्वाल, टास्क फोर्सचे डॉ. ‍मिलिंद भुरसुंडी, डॉ. सरनाईक, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण इंग्लंडमध्ये वाढत आहेत. तसेच देशात व राज्यातही ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्याच्या सूचना देताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूर शहरात संभाव्य रुग्णांची नोंद झाली असून, या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विदेशातून शहरात सुमारे ७५० प्रवासी दाखल झाले असून या सर्वांचा शोध घेवून महानगरपालिकेतर्फे कोविड तपासणी सक्तीची करावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याची माहिती टास्कफोर्सतर्फे यावेळी देण्यात आली. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. शहरात पहिला डोज शंभर टक्के पूर्ण झाला असून, ग्रामीण भागात ९० टक्के झाले आहे. त्यासोबतच शहरी व ग्रामीण भागात दुसरा डोज पूर्ण करण्याला प्राधान्य देवून येत्या दहा दिवसांत लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देशही यावेळी डॉ. राऊत यांनी दिले.

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील संरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पोस्ट कोविड रुग्णांची तपासणी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याचे आवश्यकता व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, अशा रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करुन त्यांना आहार व आरोग्याविषयी माहिती देण्यात यावी. कोविडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अवलंबून असलेल्यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. जिल्ह्यात आर्थिक मदतीसाठी आठ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये साडे सहा हजार अर्ज शहर तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रभागनिहाय तसेच तहसील कार्यालयस्तरावर विशेष कर्मचाऱ्यांच्या सेवा घेण्यात याव्यात अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

ओमायक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला टास्कफोर्स त्वरित गठित करावा व या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन व उपचार पद्धतीबाबत माहिती देण्यात यावी. बालकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक औषध पुरवठा तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news