थंडीच्या लाटेत विदर्भ गारठला; नागपुरात ७.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद | पुढारी

थंडीच्या लाटेत विदर्भ गारठला; नागपुरात ७.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

नागपूर, पुढारी वृत्तसेवा

मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भ गारठला आहे. नागपूरात सर्वाधिक कमी ७.८ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. देशाच्या उत्तरेकडून शीत वाऱ्यांचे प्रवाह वाहू लागल्याने विदर्भ गारठला असून उर्वरित महाराष्ट्रात रात्रीचा गारवा पडत आहे. निम्मा डिसेंबर सरल्यानंतर थंडीची चाहूल लागली आहे.

राज्यातील किमान तापमान सरासरीजवळ येऊन रात्रीचा गारवा वाढला आहे. सध्या राज्यात सर्वत्र निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान आहे. त्यातच उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने राज्यातील तापमानात घट झाली आहे.

विदर्भातील सर्वांत कमी म्हणजे ७.८ डिग्री तापमानाची नोंद नागपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. तर त्या पाठोपाठ गोंदिया ८.२ अंश से. किमान तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती ८.००, बुलढाणा १०.५, ब्रम्हपुरी १०.००, वर्धा ९, यवतमाळ १२. ५, चंद्रपूर १३.६, नागपूर ११.४, वाशीम १४ अंश से. व अकोला येथे ११.३ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाळी वातावरण होते. बहुतांश भागांत अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी काही भागात अंशत: ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले होते. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान झाले असून, ढगाळ वातावरणही दूर झाल्याने थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली. त्यातचउत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने दोन दिवसांपासून तापमानात घट सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट आहे.

राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आदी राज्यांत थंडीची लाट तीव्र आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथेही थंडीची लाट असून, काही ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांत किमान तापमान उणे आहे. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीजवळ आले असून, काही भागात ते सरासरीपेक्षा कमी झाल्याने रात्रीची थंडी जाणवत आहे.

हेही वाचा

Back to top button