पुणे; दिनेश गुप्ता : काहींचा नोकरीमध्ये व्यतीत होणारा सर्वाधिक वेळ तर काहींच्या ध्येयासक्तीमुळे जीवनातील संघर्षात लग्नाचे वय कधी निघून गेले, हे कळलेच नाही. कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत अशाच काही तरुणांनी लग्नाच्या काही महिन्यांनंतर कोरोनाबाधेमुळे जगाचा निरोप घेतला. अशांच्या वंशांचे दिवे तेवत राहावेत यासाठी वीर्य बँका धडपडत असतात. मात्र, कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील वीर्य बँकांमध्ये दडलेले वंशाचे दीप जणू मालवून गेले आहेत. फर्टिलिटी सेंटर्स बंद असल्याने टेस्ट ट्यूब बेबी आणि सरोगसी जन्म शून्यावर आले आहेत.
तरुणांवर कोरोनाने काळ बनून केलेला घाला त्यांच्या अनेक पिढ्यांचे नुकसान करणारा ठरला. या महामारीत काही तरुणांनी लग्नाच्या काही महिन्यांनंतर जगाचा निरोप घेतला. त्यातच निपुत्रिकांना वरदान ठरलेले
फर्टिलिटी सेंटर्स व वीर्य बँका कोरोना काळातील नुकसानीमुळे अद्याप सावरलेल्या नाहीत. फर्टिलिटी सेंटर्स बंद असल्याने टेस्ट ट्यूब बेबी आणि सरोगसी जन्म शून्यावर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 300 फर्टिलिटी सेंटर्सपैकी बरीच केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
वंशाच्या दिव्याच्या आधारावर संकट
बदलत चाललेली जीवनशैली, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व करिअर घडविण्याच्या नादात अनेक तरुण-तरुणी मूल होण्याकडे फारसे गांभीर्याने बघत नाहीत आणि जेव्हा विचार करतात तेव्हा तिशी उलटून गेलेली असते किंवा अनेकांचे वयही निघून गेलेले असते. अशावेळी उशिरा होणार्या लग्नामुळे सगळ्याच गोष्टी उशिरा होण्यास सुरुवात होेते. आता मूल होऊ दिले गेले पाहिजे असे वाटते व प्रयत्न करूनही मूल होत नाही, तेव्हा जोडपे फर्टिलिटी सेंटरचा आधार घेतात. हे सेंटर्स आता संकटात सापडले आहेत.
फर्टिलिटी सेंटर्समध्ये वंध्यत्वावरही होतात उपचार
आतापर्यंत मुले न होण्यासाठी फक्त स्त्रीलाच जबाबदार धरले जायचे. पण आता पुरुषही तितकाच जबाबदार आहे हे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. पुरुष वंध्यत्व प्रमाण वाढतच आहे. निपुत्रिकांना मूल दत्तक घेणे, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी मदर या गोष्टी ज्यांना शक्य आहे, त्यापैकी अनेकांनी हे पर्याय निवडले किंवा अजूनही ते निवडतात. अशातच पुरुष वंध्यत्व उपचारावर वीर्य बँक ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हीच जीवनदायी ठरणारी बँक आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात 300 फर्टिलिटी सेंटर्स
स्पर्म बँकेच्या माध्यमातून भारतात आयव्हीएफ तंत्रज्ञान विकसित होत गेले तसे तसे देशभरातील फर्टिलिटी सेंटर्सची संख्या वाढत चालली आहे. आज भारतात सुमारे 1700 ते 1800 च्यावर सेंटर्स आहेत. यातील महाराष्ट्रात जवळपास 300 ते 350 सेंटर्स आहेत. त्यातील पुण्यात 35 ते 40, औरंगाबाद 18 तर मुंबईसारख्या मोठ्या शहरात 70 ते 80 सेंटर्स असण्याचा अंदाज आहे.
कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा सर्वांगीण विचार करू लागली. त्यात बाळ होऊ द्यायचे की नाही हा विचार दृढ झाला. मूल होऊ देणे ही अतिशय आनंददायी गोष्ट असल्यामुळे भारतामध्ये कोरोनानंतर आयसीएमआरने 34 पानी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व स्त्री रोग तज्ज्ञ व फर्टिलिटी स्पेशालिस्ट त्याप्रमाणे काम करत आहेत.
* टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी जन्म शून्यावर
* दुसर्या लाटेत कोरोनाचा नवतरुणाच्या जीवावर घाला
* दैनंदिनी व आहार बदलाचाही परिणाम, अतिऔषध वापरांमुळे वीर्याचा दर्जा खालावला
कोरानापूर्वी आमच्याकडे स्पर्मची मोठी मागणी केली जात होती. देशभरातील डॉक्टरांना आम्ही पुरवठा करीत होतो. मात्र, लॉकडाऊन काळात निघून गेलेले स्पर्म डोनर परतलेले नाहीत. जे परतले त्यांच्यातील स्पर्म काऊंट कमी झाले असल्याने मागणीनुसार पुरवठा करणे अवघड झाले आहे. कोरोना काळात स्पर्म काऊंट का कमी झाले यावर अभ्यास सुरू आहे. स्पर्म बँका अडचणीत आलेल्या आहेत.
– गीता आचार्य, स्पर्म बँक संचालिका,औरंगाबाद