Prashant Kishor : “काॅंग्रेसने स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत” | पुढारी

Prashant Kishor : "काॅंग्रेसने स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत"

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपच्या विरोधात होणाऱ्या विरोधकांच्या एकजुटतेवर भाष्य करताना म्हटले आहे की, “देशात केवळ काॅंग्रेससहीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करता येणार नाही. त्यासाठी काॅंग्रेसला स्वत:च्याच पक्षात आधी बरेच बदल करावे लागतील”, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिलेला आहे.

उत्तर प्रदेशाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात रणनितीकार प्रशांत किशोर हेदेखील काॅंग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा सुरू होती. अशात त्यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना काॅंग्रेसला सल्ला दिला आहे.

भाजप सत्तेत आल्यापासून राजकीय वर्तुळात काॅंग्रेसचे दिवस पालटले आहेत. कठीण काळातून काॅंग्रेस जात आहे. अशा पार्श्वभूमीवर रणनितीकार प्रशांत किशोर म्हणाले की, “काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर पक्षात काही बदल करावे लागतील. पक्षाचा अध्यक्ष कोण असावा हे मी सांगणार नाही. पण केवळ विरोधी पक्षांची मोट बांधली म्हणजे भाजपचा पराभव होईल अशा विचारात राहू नये. विरोधक म्हणजे काँग्रेस पक्ष या विचारातून पक्षाला बाहेर यावं लागेल. काँग्रेसला स्वत:ला आधी पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायला हवं याचा निर्णय घ्यावा लागेल.”

“एक राजकीय पक्ष म्हणून पक्षाचा ग्राफ खूप खाली गेला आहे. सर्वात आधी तर पक्षाला आपल्या निर्णय घेण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. निर्णयाच्या पद्धतीसोबतच वेगानं निर्णय घेणं, स्थानिक नेत्यांना सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे. याशिवाय पक्षात निर्णय घेण्याच्या अधिकाऱ्यांचं केंद्रीकरण काँग्रेसनं करू नये”, असंही प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, “काॅंग्रेसने इतर नेत्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची गरज आहे. पक्षाला पुढे जाऊन विजय प्राप्त करण्यासाठी आधी स्वत:मध्ये खूप बदल करावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला प्रशांत किशोर किंवा इतर कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. यासोबतच जो कोणी पक्षाचा अध्यक्ष बनेल तो पूर्णवेळ अध्यक्ष झाला पाहिजे.”

हे वाचलंत का? 

Back to top button