डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : ‘त्या’ निर्णयाविरोधात पीडिता जिल्हा न्यायालयात | पुढारी

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : ‘त्या’ निर्णयाविरोधात पीडिता जिल्हा न्यायालयात

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार अल्पवयीन संशयित आरोपींची भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. या निर्णयाला पीडितेने आव्हान दिले आहे. संशयित आरोपींची  जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी पीडिताने ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. (Dombivli gang rape case) न्यायालयाने मानपाडा पोलिस आणि संबंधित अल्पवयीन आरोपींचे वकीलांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

Dombivli gang rape case : पुढील सुनावणी ७ जानेवारी राेजी

डाेंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. ‘आमचे म्हणणे मांडण्यासाठी थोडी मुदत द्यावी’, असे या वेळी आरोपींच्या वकिलांनी सांगितले. पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी होणार असून, याकडे लक्ष लागले आहे.

१५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्यांच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना २३ सप्टेंबर राेजी उघडकीस आली होती. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्याचे दोषारोपपत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात मानपाडा पोलिसांकडून सादर झाले आहे. दरम्यान, या गुन्हयातील एका आरोपीने जामिनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर  २२ राेजी सुनावणी होणार आहे. चार अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

अल्पवयीन आरोपींचे दोषारोपपत्र ३ दिवसात दाखल होणे गरजेचे असते; परंतू मानपाडा पोलिसांकडून ते सादर करायला दीड महिना लागल्याने दोघा अल्पवयीन आरोपींना जामीन मंजूर झाला. अन्य दोघांना आरोपपत्रानंतर जामीन मंजूर करण्यात आला. चौघांना जामीन देण्याच्या भिवंडी बाल न्यायालयाच्या निर्णयाला पीडिताच्यावतीने ठाणे येथील न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे याची सुनावणी शुक्रवारी झाली. यावेळी संबंधित अल्पवयीन आरोपींच्या वकिलांनी आम्हाला बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, असे सांगितले. त्यामुळे आता  ७ जानेवारी रोजी ते काय बाजू मांडतात, हे पाहणे महत्त्‍वाचे ठरणार आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button