काेणतीही निवडणूक नसल्‍यानेच कर्नाटक घटनेबाबत मोदी सरकारचे माैन : वैभव पाटील | पुढारी

काेणतीही निवडणूक नसल्‍यानेच कर्नाटक घटनेबाबत मोदी सरकारचे माैन : वैभव पाटील

विटा : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना मतदान मिळत नाही. मात्र आत्ता कुठलीच निवडणूक नाही, म्हणूनच मोदी सरकारने कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेबाबत माैन धारण केले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते आणि विटा पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. विटा (जि. सांगली) येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळासमोर एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध केला.

आज सकाळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसनराव जानक र,शहराध्यक्ष अविनाश चोथे, किरण तारळेकर, विशाल पाटील, गजानन निकम, संभाजी मोरे प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी वैभव पाटील म्हणाले, कर्नाटकात घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. मात्र त्याही पेक्षा जास्त कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे संतापजनक आहे, असेही ते म्‍हणाले.

बाबासाहेब मुळीक म्हणाले, भाजपचे सरकार कर्नाटकात आल्यापासून मराठी आणि मराठी अस्मितेची उघड उघड गळचेपी सुरू आहे.  आता मात्र पाणी डोक्यावरून चालले आहे. असले प्रकार महाराष्ट्र खपवून घेणार नाहीत. यावेळी फिरोज तांबोळी, गजानन निकम यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

Back to top button