हेलिकॉप्टर दुर्घटना : ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन | पुढारी

हेलिकॉप्टर दुर्घटना : ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे उपचारादरम्यान निधन

बंगळूर : पुढारी ऑनलाईन डेस्क

तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Captain Varun Singh) यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. याबाबतची माहिती भारतीय हवाई दलाने ट्विट करत दिली आहे.

तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात ८ डिसेंबर रोजी लष्कराचे ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे १२ अधिकारी होते. पैकी बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पण आज उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल भारतीय हवाई दलाने दुःख व्यक्त केले आहे.

ऑगस्टमध्ये वरुण सिंह (Captain Varun Singh) यांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या वर्षी विमान उड्डाणाच्या वेळी मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी विमान हाताळण्याचे धैर्य दाखविले होते. हवाई आपत्कालीन परिस्थिती असतानाही त्यांनी तेजस फायटर सुरक्षितपणे उतरवले होते.

वरुण सिंह हे मूळचे भोपाळचे आहेत. त्यांनी अदम्य धैर्य दाखवत १० हजार फूट उंचीवरून विमान सुरक्षितपणे उतरवले. आपल्या जीवाची पर्वा न करता वरुण यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवत लोकवस्तीच्या बाहेर विमान उतरवले होते.

देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत (cds bipin rawat) यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्याकडे या दुर्घटनेच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. सिंग हे हवाई दलाच्या प्रशिक्षण विभागाचे कमांडर आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button