Rajnath Singh : उड्डाणाच्या वीस मिनिटानंतर तुटला होता हेलिकॉप्टरचा संपर्क | पुढारी

Rajnath Singh : उड्डाणाच्या वीस मिनिटानंतर तुटला होता हेलिकॉप्टरचा संपर्क

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : Rajnath Singh : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने बुधवारी सकाळी 11.48 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर वीस मिनिटांनी म्हणजे दुपारी 12.08 वाजता हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क तुटला. याच्या काही मिनिटांतच स्थानिक लोकांनी आगीने वेढलेले हेलिकॉप्टर कोसळताना पाहिले होते, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी संसदेत दिली.

रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अन्य मान्यवरांच्या निधनाबद्दल सिंग यांनी शोक व्यक्त केला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून 14 पैकी 13 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात रावत दांपत्याचा समावेश होता.

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिक लोक तसेच प्रशासनाने मदतीसाठी धाव घेतली होती. अपघात स्थळावरून काढण्यात आलेल्या लोकांना वेलिंग्टन येथील रुग्णालयात नेण्यात आले होते, असेही राजनाथ सिंग यांनी सांगितले.

लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रावत तसेच इतर मान्यवरांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. यानंतर खासदारांनी दोन मिनिटांचा मौन पाळत मृतांना श्रद्धांजली वाहिली.

Rajnath Singh : पूर्ण लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यावर पूर्ण लष्करी इतमामात अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली. लष्करी तळ असलेल्या दिल्ली कॅन्टोनमेंट येथे रावत यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्याकडे हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. सिंग हे हवाई दलाच्या प्रशिक्षण विभागाचे कमांडर आहेत.

आंदोलन न करण्याचा विरोधकांचा निर्णय

राज्यसभेच्या बारा खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा निषेध म्हणून मागील काही दिवसांपासून विरोधी पक्ष संसदेत आंदोलन करीत आहेत. बिपीन रावत यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एका दिवसासाठी आंदोलन न करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करीत एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस अमित शहा, राजनाथ सिंग, प्रल्हाद जोशी, निर्मला सीतारामन, अनुराग ठाकूर आदी मंत्री उपस्थित होते.

Back to top button