

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : Brigadier Hemant Mahajan : तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात बुधवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी लष्कराचे 'एमआय १७ व्ही ५' हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे १२ अधिकारी होते. पैकी बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत ते एकमेव बचावले. जनरल रावत हे कुन्नूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होऊन सुलूर येथे परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील त्यांच्या अपघाती मृत्यूने देशभर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात हा घातपात असावा, अशी शक्यता निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली आहे. चीनसारख्या देशाने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे का? हेदेखील पाहावे लागेल. या घातपातामागे असणार्या देशाला जशास तसे उत्तर द्यावेच लागेल, असे ते म्हणाले.
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने उभ्या देशाला धक्का बसला आहे; पण विषय राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडित असल्याने लगोलग रावत यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करावी, त्याबाबत बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. बिपीन रावत यांच्या जागी नवे सीडीएस कोण, त्याबाबतही चर्चा झाली. सेवाज्येष्ठतेच्या हिशेबाने लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांची दावेदारी प्रबळ आहे.
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे कळताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी अधिकार्यांकडून त्याबाबतची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर ते तडक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले. संसद भवनातच ही भेट झाली. राजनाथ सिंह यांनी या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राजनाथ सिंह लष्करप्रमुख नरवणे यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकारी, कोब्रा कमांडोचे जवान तातडीने हजर झाले. सर्व 13 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ते ओळखू येणार नाहीत, अशा स्थितीत आहेत.
मृतदेह 80 टक्क्यांवर जळालेले असल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी 'डीएनए' चाचणी करण्यात येणार आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित मंत्रिमंडळाची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला.
विस्तृत माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी संसदेत देणार आहेत.
जनरल रावत यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अपघातानंतर जवळपास एका तासाने देण्यात आली होती.
रावत यांच्या प्रकृतीबाबतही कुठले अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नव्हते.
जनरल रावत गंभीर जखमी असल्याचे काहींचे म्हणणे होते.
दुसरीकडे, काही लष्करी अधिकार्यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट केले.
अपघाताची तीव्रताच इतकी होती की, त्यातून कुणीही वाचलेले असण्याची शक्यता गृहीत धरायलाही कुणी तयार नव्हते.
सायंकाळी रावतही या दुर्घटनेत शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
जनरल रावत देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते.