हेलिकॉप्टर अपघाताची ‘ही’ असू शकतात कारणे; चौकशी समिती… | पुढारी

हेलिकॉप्टर अपघाताची ‘ही’ असू शकतात कारणे; चौकशी समिती...

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन :  तामिळनाडूतील कुन्नूरनजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी सुरू असून याची अनेक कारणे असू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य ११ जणांचा मृत्यू झाला. लष्कराचे सर्वात शक्तिशाली हेलिकॉप्टर अशा पद्धतीने क्रॅश झाल्याने हा धक्का मानला जात आहे.

अतिशय सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले हे हेलिकॉप्टर कसे कोसळले याची चर्चा सुरू आहे. यासाठी त्रिदलीय चौकशी नेमण्यात आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रावत यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कसर ठेवली जात नाही. असे असतानाही हा अपघात झाला कसा? असा प्रश्न सर्वच यंत्रणांना सतावत आहे.

रावत हे वेलिंग्टन येथे आर्मी कॅडेटना व्याख्यान देण्यासाठी जात होते. सुलूर एअरबेसवरून त्यांच्या हेलिकॉप्टने उड्डाण केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य १३ जण होते. १४ पैकी १३ जणांचा या अपघाती मृत्यू झाला. रावत यांच्यासह हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला जखमी अवस्थेत वेलिंग्टन येथे नेण्यात आले होते. मात्र, रावत यांचा वाटेत मृत्यू झाला.

या अपघातामागे अनेक कारणे असू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रमुख कारण असू शकते ते म्हणजे हवामान. हवामानामुळे अनेकदा अपघात होतात. कुन्नूरमध्ये निलगिरी पर्वतरांग आहे. हा परिसर अतिशय घनदाट आणि उंच झाडांचा आहे. या अपघातामागे येथील हवामान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. पर्वतरांग आणि जंगलातील हवाई वाहतूक तशी धोकादायक असते. अनेकदा दाट धुक्यांमुळे मोठी झाडे दिसत नाहीत. त्यामुळे या झाडांना हेलिकॉप्टर धडकू शकते. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत आहे. तसेच डोंगर, पर्वत आणि जंगल भागात दाट धुके पडत आहे. कुन्नूर परिसरात त्या दिवशी दाट धुके होते. या धुक्यातून कमी उंचीवरून जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पायलटला उंच झाड दिसले नसावे. त्यामुळे त्याला धडकून हेलिकॉप्टर क्रॅश झाले असावे.

हेलिकॉप्टर अपघाताची कारणे : तांत्रिक बिघाड

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी असलेली हेलिकॉप्टर आणि त्याचे पायलट हे उच्च दर्जाचे असतात. पायलट हे सर्वात अनुभवी असतात. मात्र, उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने त्याने पेट घेतलेला असू शकतो. मात्र, या हेलिकॉप्टरचा मागील भागात उच्च तापमानरोधक यंत्रणा असते. त्यामुळे हा भाग आग लागल्यानंतरही सुरक्षित राहू शकतो. तरीही या अपघातात हेलिकॉप्टरचा संपूर्ण भाग जळून खाक झाला आहे. हे हेलिकॉप्टर हवेत पेटले असावे आणि त्यानंतर कोसळले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे.

यांचा झाला होता मृत्यू

जनरल बिपीन रावत, पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, स्क्वार्डन लीडर कुलदीप सिंग, लान्स नायक बी साई तेजा, नायक गुरुसेवक सिंग, विंग कमांडर पी. एस. चौहान, वॉरंट ऑफिसर राणाप्रताप दास, लान्स नायक विवेक कुमार, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, वॉरंट ऑफिसर प्रदीप अरक्कल, नायक जितेंद्र कुमार, हवालदार सतपाल राय या १३ जणांचा यात मृत्यू झाला.

हेही वाचा : 

Back to top button