जनरल बिपीन रावत : गोरखा रायफल्‍स ते देशाचे पहिले सीडीएस | पुढारी

जनरल बिपीन रावत : गोरखा रायफल्‍स ते देशाचे पहिले सीडीएस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

तामीळनाडूमधील कुन्नूर नजीक भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 कोसळले. या दुर्घटनेत देशाचे पहिले चीफ ऑन डिफेन्‍स स्‍टाफ  ( सीडीएस) बिपीन रावत यांचे आज निधन झाले. या दुर्घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

जाणून घेवूया बिपीन रावत यांच्‍या कारर्किदीविषयी…

घरातूनच देशसेवेचा वारसा

बिपीन रावत यांचा जन्‍म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. त्‍यांना देशसेवेचा वारसा घरातूनच मिळाला. त्‍यांचे वडील भारतीय सैन्‍यदलात लेफ्‍टनंट जनरल होते. त्‍यांचे शालेय शिक्षण सिमला येथील सेंट एडवर्ड स्‍कूलमध्‍ये झालं. यानंतर त्‍यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्‍ये प्रवेश घेतला. यावेळी त्‍यांना ‘स्‍वॉर्ड ऑफ ऑनर’ने सन्‍मानित करण्‍यात आले होते.

गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये नियुक्‍ती

डिसेंबर १९७८ मध्‍ये भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये त्‍यांची निवड झाली. भारतीय सैन्‍यदलात त्‍यांनी क्रॉप्‍स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए डेहराडून, डिफेन्‍स ऑपरेशन्‍स डायरेक्‍टरोरेट लॉजिस्‍टिक्‍स स्‍टाफ ऑफिसर आदी पदांवर उल्‍लेखनीय काम केले.

उंच युद्ध क्षेत्रावरील रणनिती आणि धडक कारवाईमधील तज्‍ज्ञ

आपल्‍या लष्‍कर सेवेत बिपीन रावत यांनी प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी ), चीन सीमा आणि ईशान्‍य भारतातील सीमेवर दीर्घ काळ सेवा बजावली. चीन सीमेवर ते इंफेंट्री बटालियनचे कर्नल होते. काश्‍मीरमध्‍ये नॅशनल रायफल्‍स ब्रिगेडिअर आणि त्‍यानंतर नंतर इंफेंट्री डिव्‍हिजनचे मेजर जनरल पदाची जबाबदारी त्‍यांनी संभाळली. बिपीन रावत यांनी १९९९मध्‍ये कारगिल युद्‍धात सहभाग घेतला होता. तसेच संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या शांती मिशनचेही त्‍यांनी नेतृत्‍व केले होते. दक्षिण कमांडाची जबाबदारी असताना त्‍यांनी पाकिस्‍तानच्‍या नजीक असणार्‍या सीमेवर हवाईदल आणि नौदलाबरोबर उत्‍कृष्‍ट समन्‍वय ठेवला होता. २०११ मध्‍ये त्‍यांनी चौधरी चरण सिंग विद्‍यापीठातून ‘मिलिट्री मीडिया स्‍टडीज’ या विषयात पीएचडी संपादन केली होती.

२०१५ मधील म्‍यानमारमधील लष्‍कराने केली धडक कारवाई

जून २०१५ मध्‍ये मणिपूरमध्‍ये दहशतवादी हल्‍ल्‍यात १८ जवान शहीद झाले होते. या भ्‍याड हल्‍ल्‍याचा बदला घेण्‍यासाठी भारतीय लष्‍कराने मान्‍यमारमध्‍ये घुसून एनएससीएन (के) आणि केवायकेएल या दोन दहशतवादी संघटनांची तळ उद्‍ध्‍वस्‍त केले होते. हे भारतीय लष्‍कराचे पहिले सर्जिकल स्‍ट्राईक मानला जातो. या कारवाईवेळी बिपीन रावत यांनी रणनीती महत्‍वपूर्ण ठरली होती.

पाकिस्‍तान लष्‍कराला धडकी भरविणारा ‘सर्जिकल स्‍ट्राइक’

२०१६मध्‍ये उरीमधील भारतीय लष्‍कराच्‍या तळावर दहशतवादी हल्‍ला झाला होता. या भ्‍याड हल्‍ल्‍याचा बदला घेण्‍याचा निर्धार भारतीय लष्‍कराने केला. २९ सप्‍टेंबर २०१६ रोजी पाकिस्‍तानमधील दहशतवादी तळ उद्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी भारताने सर्जिकल स्‍ट्राइक केला. त्‍यावेळी बिपीन रावत हे देशाचे उप लष्‍करप्रमुख होते

विविध पुरस्‍कारांनी कामगिरीचा सन्‍मान

लष्‍करसेवेत त्‍यांनी उंचावरील युद्‍ध क्षेत्र आणि दहशतवाद विरोधी अभियानात अधिक काळ काम केले होते. या काळात त्‍यांच्‍या कामगिरीचा अनेक पुरस्‍कार देवून गौरव करण्‍यात आला होता. परम विशिष्‍ट सेवा, उत्तम युद्‍ध सेवा, अति विशिष्‍ट सेवा, विशिष्‍ट सेवा, युद्‍ध सेवा पदक आणि सेना पदकांनी त्‍यांच्‍या कामगिरीचा सन्‍मान करण्‍यात आला होता.

देशाचे पहिले सीडीएस

बिपीन रावत यांनी देशासाठी केलेल्‍या अतिविशिष्‍ट सेवेमुळे ३१ डिसेंबर २०‍१६ रोजी त्‍यांची लष्‍कर प्रमुखपदी नियुक्‍त करण्‍यात आले. १९९९ पाकिस्‍तानविरोधात कारगिल युद्‍ध झाले. या युद्‍धानंतर देशातील पायदल, नौदल आणि हवाई दलांमधील समन्‍वय साधण्‍यासाठी चीफ ऑफ डिफेन्‍स स्‍टाफ ( सीडीएस ) या पदाची निर्मिती करण्‍यात यावी, अशी शिफारस करण्‍यात आली होती. केंद्र सरकारने २०१९ मध्‍ये चीफ ऑफ डिफेन्‍स (सीडीएस) या पदाची निर्मिती केली.

लष्‍करप्रमुख म्‍हणून निवृत झाल्‍यानंतर केंद्र सरकारने ‘सीडीएस’ पदावर बिपीन रावत यांची नियुक्‍ती केली. देशाचे पहिले सीडीएस होण्‍याचा बहुमान त्‍यांना मिळाला होता.

हे ही वाचलं का ?

Mi-17V-5 हेलिकॉप्टर : रशियन निर्मित जगातील सर्वांत हायटेक चॉपर्सपैकी एक; त्याची रचनाच भव्यदिव्यता सांगते

Back to top button