नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
केंद्र सरकारच्या वनस्पती जाती संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण (पीपीव्ही-एफआर) ने पेप्सिको कंपनीला तगडा झटका दिलाय. पेप्सिकोच्या (PepsiCo Lays potato chips) लोकप्रिय लेज बटाटा चिप्ससाठी खास पिकवण्यात येणाऱ्या बटाटा वाणाचे पेटंट रद्द करण्यात आले आहे. गुजरातसह देशातील शेतकऱ्यांचा हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे.
२०१९ मध्ये PepsiCo ने गुजरातमधील काही शेतकर्यांवर एफसी ५ (FC5) या बटाट्याच्या वाणाची लागवड केल्याबद्दल खटला दाखल केला होता. पण कंपनीने त्याच वर्षी खटला मागे घेतला. या दाव्यावर तोडगा काढण्याची इच्छा त्यावेळी कंपनीने व्यक्त केली होती. पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या कविता कुरुगंटी यांनी पेप्सिकोच्या बटाटा वाण नोंदणी विरोधात पीपीव्ही-एफआर कडे याचिका दाखल केली. पेप्सिकोच्या FC5 बटाटा वाणाला दिलेले बौद्धिक संरक्षण रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. भारतीय कायदे बियाण्याच्या वाणांवर पेटंट घेण्याची परवानगी देत नाहीत, असा दावा त्यांनी केला होता.
पीपीव्ही-एफआरने कुरुगंटी यांच्या दाव्याशी सहमती दर्शवत पेप्सिको (PepsiCo Lays potato chips) बियाण्याच्या वाणांवर पेटंटचा दावा करू शकत नाही, असे स्पष्ट केले. यामुळे कंपनीच्या नोंदणीचे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात आले आहे, असे पीपीव्ही-एफआरचे अध्यक्ष के. व्ही. प्रभू यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
या आदेशानंतर बोलताना पेप्सिको इंडियाच्या प्रवक्त्यानी म्हटले आहे की, पीपीव्ही-एफआरने जो आदेश दिला आहे त्याची आम्हाला कल्पना आहे. आणि आम्ही या आदेशाबद्दल आधिक जाणून घेत आहोत.
एफसी ५ हे बटाट्याचे वाण विकसित केल्याचा दावा करत पेप्सिकोने २०१६ मध्ये त्याची नोंदणी केली होती. कंपनीने पहिल्यांदा १९८९ मध्ये भारतात बटाटा चिप्सचा प्रकल्प उभारला होता. शेतकऱ्यांचा एक गट एफसी ५ या बटाटा वाणाची लागवड करतो आणि एका निश्चित किमतीत त्याची कंपनीला विक्री करतो. त्यासाठी पेप्सिको कंपनी बटाटा चीप्सची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत करार करते.
"पीपीव्ही-एफआर दिलेला आदेश भारतातील शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे आणि कोणत्याही पिकाची लागवड करण्याच्या त्यांच्या अधिकाराची पुष्टी करतो," असे गुजरातमधील शेतकरी बिपीन पटेल यांनी म्हटले आहे. बिपीन पटेल हे गुजरातमधील शेतकऱ्यांपैकी एक होते, ज्यांच्या विरोधात पेप्सिकोने २०१९ मध्ये खटला दाखल केला होता.