बांगलादेशमधील हिंदूंचे भवितव्य काय? | पुढारी

बांगलादेशमधील हिंदूंचे भवितव्य काय?

- प्रसाद प्रभू

बांगला देश ला स्वातंत्र्य मिळाले आणि शेख मुजिबूर रेहमान पहिले अध्यक्ष आणि पंतप्रधान झाले, तेव्हा या देशाच्या घटनेमध्ये निधर्मीवाद, लोकशाही, समाजवाद आणि राष्ट्रवाद ही प्रमुख चार तत्त्वे होती; पण 1975 मध्ये रेहमान यांची लष्करी बंडामध्ये हत्या झाल्यानंतर या चार तत्त्वांची पायमल्ली सुरू झाली. अल्पसंख्याकांवरील अत्याचारांत वाढ झाली.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जगभरातील इस्लामबहुल देशातील दहशतवाद्यांना स्फुरण चढले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर आणि बांगला देशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बांगला देशमध्ये दुर्गापूजा उत्सवाच्या दरम्यान झालेला हिंसाचार. पूर्वीचा पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगला देशला 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळाले ते भारतीय सैन्याच्या मदतीनेच. विशेष म्हणजे, 1947 पर्यंत पूर्व पाकिस्तानमध्ये 35 टक्के हिंदू होते; पण 1971 मध्ये बांगला देशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे प्रमाण वीस टक्क्यांपर्यंत घसरले आणि सध्या बांगला देशात 9 टक्के हिंदू आहेत.

शेख मुजिबूर रेहमान बांगला देशचे पहिले अध्यक्ष आणि पंतप्रधान झाले, तेव्हा या देशाच्या घटनेमध्ये निधर्मीवाद, लोकशाही, समाजवाद आणि राष्ट्रवाद ही प्रमुख चार तत्त्वे होती; पण 1975 मध्ये शेख मुजिबूर रेहमान यांची लष्करी बंडामध्ये हत्या झाल्यानंतर या चार प्रमुख तत्त्वांची पायमल्ली होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळेच बांगला देशमधील अल्पसंख्याकांवरील अत्याचारात वाढ होऊ लागली. 1988 मध्ये हुसेन मोहम्मद इर्शाद हे बांगला देशचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तत्काळ बांगलादेश हा इस्लामी देश असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून बांगला देशची ओळख इस्लामी राष्ट्र अशी झाली. त्यानंतर या देशातील अल्पसंख्याक हिंदू आणि बौद्ध यांना तृतीय दर्जाचे नागरिक म्हणून पाहिले आणि वागवले जाऊ लागले.

शेख हसीना यांचा अपवाद वगळता शेख मुजिबूर रेहमान यांच्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले किंवा राजकीय लाभासाठी मूलतत्त्ववाद्यांना अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यास मोकळीक दिली. धार्मिक छळ, जबरदस्तीने मालमत्ता ताब्यात घेणे, धर्मांतर, बलात्कार, अपहरण, खंडणी उकळणे इत्यादी अत्याचारामुळे बांगलादेशमधील हिंदू गांजून गेले आहेत. गेल्या पाच दशकांत बांगलादेशी हिंदूंनी सव्वीस लाख एकर जमीन गमावली आहे. त्याचप्रमाणे 1964 ते 2013 या कालावधीत 1 कोटी 13 लाख हिंदूंनी बांगला देशातून भारतात आणि इतर देशांत स्थलांतर केले आहे, असे ढाका विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक अब्दुल बरकत यांनी ‘डीप्रायव्हेशन ऑफ हिंदू मायनॉरिटी इन बांगलादेश ः लिव्हिंग वेस्टेड प्रॉपर्टी’ या पुस्तकात नमूद केले आहे. ज्या बांगला अस्मितेसाठी बांगला देशने लढा दिला तिथे आता अरेबिक आणि उर्दूचा प्रभाव वाढत आहे. तब्लिघी जमात, देवबंदी, अहले हदीत, जमात-ए-इस्लामी अशा असंख्य मूलतत्त्ववादी संघटना बांगला देशात हिंदूंवर अत्याचार आणि धर्मांतर करण्यात अग्रेसर आहेत. शहादत वाहिनी ही दहशतवादी संघटना बांगलादेशी हिंदूंना भारतात पळून लावून त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. हिंदू धर्मावर आग ओकणारा इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक हा जगात सर्वांत जास्त बांगला देशमध्ये लोकप्रिय आहे. पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संघटना बांगलादेशी मूलतत्त्ववादी आणि दहशतवाद्यांना मदत करीत असते.

बांगला देशात 13 ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा उत्सवात झालेला हिंसाचार हा गेल्या दहा वर्षांतील सर्वांत मोठा हिंसाचार आहे. दुर्गापूजा उत्सव हा बांगलादेशी हिंदू अल्पसंख्याकांचा सर्वांत मोठा सण आहे. यावर्षी बांगला देशातील 32 हजार 119 ठिकाणी दुर्गादेवीची पूजा झाली. त्यापैकी 238 मंडप हे राजधानी ढाका येथे होते. या उत्सवात कोमिला शहरातील एका दुर्गापूजा उत्सव मंडपात कुराणाची प्रत ठेवून अवमान केल्याची बातमी सोशल मीडियावर झळकली आणि हिंसाचारास प्रारंभ झाला. यात हिंदूंच्या शेकडो घरांना आणि मालमत्तांना आगी लावल्या गेल्या. सुप्रसिद्ध इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला. या हिंसाचाराचे जगभर पडसाद उमटले. युनो, अमेरिका आणि इतर अनेक देशांनी या हिंसाचाराचा निषेध केला. सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही या हिंसाचाराचा निषेध केला.

शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने या हिंसाचाराचा ठपका बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यावर ठेवला. 2023 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा हिंसाचार घडवला गेला, असा आरोप विरोधी पक्षांवर केला गेला. बांगला देशची प्रतिमा मलिन करण्याचे हे कारस्थान आहे, असे बांगला देशच्या गृहमंत्र्यांनी म्हटले, तर पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने हा हिंसाचार घडवून आणला असावा, असाही अंदाज आहे. कारण, शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या सुयोग्य कारभार करून देशाच्या विकासाकडे जास्त लक्ष दिले. भारताशी या सरकारचे चांगले संबंध आहेत. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुतांश हिंदू शेख हसिना यांच्या अवामी लीगला भरघोस मतदान करतात. ही विरोधी पक्षांची पोटदुखी आहे. पाकिस्तानच्या आयएसआयचेही शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत; पण बांगला देशात हिंदूंविरुद्ध हिंसाचार करण्यासाठी कारण लागतेच असे नाही.

परवाच्या हिंसाचारप्रकरणी बांगला देश पोलिसांनी तातडीने कारवाई करून पाचशेपेक्षा जास्त दंगलखोरांना अटक केली. एक इस्लामी युवक कुराणाची प्रत दुर्गापूजा मंडपामध्ये ठेवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले आणि त्यावरून पोलिसांनी दोन मुस्लिम युवकांना अटक केली. आता या युवकांनी हे कृत्य का केले, याचे कारण उघड होईल; पण हा एका मोठ्या कारस्थानाचा भाग आहे, हे या घटनेवरून दिसून येते. दुर्गापूजा उत्सवात हिंसाचार झाला, तरी बांगला देशातील इतर राजवटींच्या मानाने शेख हसीना यांच्या राजवटीत हिंदू अल्पसंख्याक बर्‍याच प्रमाणात सुरक्षित आहेत. कारण, शेख हसीना यांचे सरकार गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करून त्यांना शिक्षाही देते. हिंसाचार संपल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजधानी ढाक्यातील सुप्रसिद्ध ढाकेश्वरीदेवी मंदिराला भेट देऊन तेथे पूजाही केली आणि धार्मिक सलोख्याचा दाखला दिला. तथापि, बांगला देशात हिंदू अल्पसंख्याकांची झपाट्याने होत चाललेली घट आणि त्यांचे भवितव्य काय, हा मोठा चिंतेचा विषय आहे.

Back to top button