Wasim Rizvi : शिया वक्‍फ बोर्डाचे माजी चेअरमन वसिम रिझवींनी केला हिंदू धर्मात प्रवेश | पुढारी

Wasim Rizvi : शिया वक्‍फ बोर्डाचे माजी चेअरमन वसिम रिझवींनी केला हिंदू धर्मात प्रवेश

लखनौ : पुढारी ऑनलाईन : शिया वक्‍फ बोर्डाचे माजी चेअरमन वासिम रिझवी (Wasim Rizvi) यांनी आज हिंदू धर्मात प्रवेश केला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील दसना देवी मंदिरात महंत यती नरसिंम्‍हानंद गिरी महाराज यांनी त्‍यांना हिंदू धर्माची दिक्षा दिली. काही दिवसांपूर्वीच रिझवी यांचे मृत्‍यूपत्र चर्चेचा विषय ठरले होते. यामध्‍ये त्‍यांनी मृत्‍यूनंतर माझा मृतदेह दफन न करता त्‍यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्‍यसंस्‍कार करावे, असे म्‍हटलं होते.

मला इस्‍लाममधून बहिष्‍कृत करण्‍यात आले. दर शुक्रवारी ते माझी हत्‍या करण्‍यासाठी बक्षीसे लावली जात होती. त्‍यामुळे मी कोणता धर्म स्‍वीकारावा हा माझा व्‍यक्‍तिगत निर्णय आहे. सनातन धर्म हा जगातील पहिला धर्म आहे. यामध्‍ये माणुसकी आहे. म्‍हणून मी सनातन धर्म स्‍वीकारत आहे, असे वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी सांगितले.

Wasim Rizvi : यामुळे वसिम रिझवी सापडले होते वादाच्‍या भोवर्‍यात

रिझवी यांनी कुराणमधील २६ आयती हटविण्‍यात याव्‍यात, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. यानंतर ते वादाच्‍या भोवर्‍यात सापडले. सर्वोच्‍च न्‍यायालयाने ही याचिका फेटाळली होती. रिझवी हे २०००मध्‍ये समाजवादी पार्टीच्‍या तिकिटावरुन लखनौ महापालिकेत नगरसेवक झाले. २००८ मध्‍ये शिया सेंट्रल वक्‍फ बोर्डाचे सदस्‍य झाले होते.

समाजवादी पार्टीमधून त्‍यांनी २०१२मध्‍ये हकालपट्‍टी करण्‍यात आली. यानंतर एका फंड घोटाळा प्रकरणातही ते आरोपी होते, त्‍यांची न्‍यायालयाने निर्दोष मुक्‍तता केली होती. २०१८ मध्‍ये रिझवी यांनी मदरशांवर बंदी घालण्‍यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ पाठवले होते.

काही दिवसांपूर्वीच वसीम रिझवी यांचं मृत्यूपत्र चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यात त्यांनी मृत्यूनंतर मला दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत, अशी घोषणा केली होती. यती नरसिंहानंद यांनी माझ्या चितेला अग्नी द्यावी असेही ते म्हणाले होते. यानंतर आता प्रत्यक्षात त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करत हा धर्म स्वीकारला आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button