दानेश कनेरिया वकार यूनुसच्या वक्तव्यावर भडकला; म्हणाला, मी अभिमानी हिंदू! | पुढारी

दानेश कनेरिया वकार यूनुसच्या वक्तव्यावर भडकला; म्हणाला, मी अभिमानी हिंदू!

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही देशातील काही लोकांनी धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली. यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार यूनुसने केलेल्या वक्तव्याने तर क्रिकेट जगत हादरले. या वक्तव्यावर पाकिस्तानचाच माजी फिरकीपटू दानेश कनेरिया चांगलाच भडकला. त्याने कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

वकार यूनुसने पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर मोहम्मद रिझवानने सामन्यादरम्यान हिंदूंच्या समोर नमाज पठण केल्याने जो आनंद झाला तो त्याची बॅटिंग पाहून झालेल्या आनंदापेक्षा जास्त होता असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हर्षा भोगले म्हणाले की, ‘वकार यूनुस सारख्या माणसाकडून असे वक्तव्य येणे हे एकदम चुकीचे आहे. आमच्यासारखे अनेक लोक अशा वक्तव्ये करण्यापासून दूर असतात. असं ऐकणे खूप भयानक आहे.’

हेही वाचा : मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या मुंबई संघातील चार खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

ते पुढे म्हणाले की, ‘मी आशा करतो की पाकिस्तानात असे अनेक क्रिकेटप्रेमी या धोकादायक वक्तव्य सावधतेने पाहतील आणि माझ्या निराशेमध्ये सामिल होतील. आमच्यासारख्या क्रिकेटप्रेमींना हा फक्त खेळ आहे हे सांगणे कठिण झाले आहे.’

दानेश कनेरिया देखील वकारवर भडकला

भोगलेंनंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू दानेश कनेरिया देखील वकार यूनुसच्या वक्तव्यावर व्यक्त झाला. त्याने कू अॅपवरील आपल्या अकाऊंटवरून आपले मत व्यक्त केले. दानेश कनेरिया म्हणाला, ‘यूनुसने पाकिस्तानी चायनलवर हिंदूंबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. मी एक अभिमानी हिंदू आहे. हे वक्तव्य किती भेदभाव आहे हे सिद्ध करते. मला खूप राग आला आहे. खेळात धर्म आणू नका.’

सोशल मीडियावर वकार यूनुसच्या या वक्तव्यावरून तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर त्याने माफीनामा सादर केला. त्याने ‘मी जे काही म्हणालो त्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. मी यासाठी माफी मागतो. भावनेच्या भरात मी हे बोलून गेलो. खेळ हा जात, धर्म, रंग याची कोणतीही परवा न करता लोकांना एकत्र ठेवते. माफ करा!’ असे ट्विट केले.

Back to top button