Lok Sabha Election 2024 : हरियाणात भाजपने केली विरोधकांची कोंडी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : हरियाणात भाजपने केली विरोधकांची कोंडी

शिवानी पाण्डेय

या राज्यात एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 99 लाख 38 हजार 247 एवढी आहे. यात 85 हून अधिक वय असलेल्यांची संख्या आहे सुमारे अडीच लाख. तसेच, शंभरी पार केलेले मतदार 11 हजार एवढे आहेत. मतदानासाठी राज्यात एकूण 19 हजार, 812 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ( Lok Sabha Election 2024 )

गेल्या म्हणजेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने हरियाणात दहापैकी दहा जागा जिंकून, विरोधकांना आसमान दाखविले होते. यावेळी पुन्हा एकदा तशाच दणदणीत विजयाची अपेक्षा भाजप बाळगून आहे. याकरिता भाजपने चाणाक्ष खेळी करून राज्यात नेतृत्वबदल केला. वरवर पाहता ही नेहमीचीच घटना आहे, असे वाटू शकते.

वास्तवात मनोहरलाल खट्टर यांना हटवून त्यांच्या जागी 13 मार्च रोजी नायबसिंह सैनी यांची निवड करताना भाजपने ओबीसी कार्ड खेळले आहे. या राज्यात विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे भाजपला दुष्यंत सिंह चौटाला यांच्या जननायक पक्षाशी समझोता करावा लागला. यानंतर पहिली सुमारे साडेचार वर्षे खट्टर यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते. ते दूरदृष्टीचे नेते मानले जातात. ‘ठंडा करके खाना’ ही त्यांची राजकारणाची पद्धत.

आपल्या एकूण साडेनऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी सरकार प्रमुख या नात्याने शासकीय कामकाज पारदर्शी करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याबद्दल वारंवार त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. असे असले तरी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने धक्कातंत्र अवलंबून खट्टर यांना बाजूला केले व त्यांचेच शिष्य मानले जाणारे सैनी यांना मुख्यमंत्रिपदी बसविले.

विरोधकांना कोंडीत पकडणारी खेळी

हरियाणात जाट आणि ओबीसी यांची संख्या लक्षणीय आहे. हा वर्ग राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक आहे. ओबीसी समाज भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. सैनी हे ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसींना चुचकारण्यासाठी भाजपने केलेली ही खेळी विरोधकांना कोंडीत पकडणारी ठरल्याचे चित्र दिसत आहे. या राज्यात भाजपची लढत काँग्रेसशी आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा जाट असून, जाट समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे हुड्डा यांना शह देण्यासाठी सैनी यांची योजना भाजपने बनविली आहे. अर्थात, ही खेळी किती लाभदायी ठरली, हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

खट्टर लोकसभा लढणार

भाजपने आतापर्यंत एकूण सहा जागांवरील उमेदवारांची घोषणा करताना यावेळी आपल्या दोन विद्यमान खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. विशेष म्हणजे खट्टर यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतले असले, तरी त्यांना कर्नाल मतदारसंघातून लोकसभेच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. तेथील विद्यमान खासदार संजय भाटिया यांचे तिकीट कापण्यात आले असून सिरसाच्या खासदार सुनीता दुग्गल यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. सिरसातून यावेळी माजी खासदार अशोक तंवर यांना तिकीट देण्यात आले आहे. गुरुग्राम मतदारसंघातून भाजपने लागोपाठ तिसर्‍यांदा केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांना उमेदवारी बहाल केली आहे.

तसाच प्रकार फरिदाबादमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुज्जर यांच्या बाबतीत दिसून येतो. तेसुद्धा तिसर्‍यांदा लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. दुसरीकडे, भिवानी-महेंद्रगढ मतदारसंघातून विद्यमान खासदार धर्मवीर यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. अंबालातून माजी केंद्रीय राज्यमंत्री कै. रतनलाल कटारिया यांची पत्नी बंतो कटारिया यांना रिंगणात उतरविले आहे.

काँग्रेसमध्ये सगळा कारभार थंड

भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने यावेळी हरियाणात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासोबत आघाडी केली आहे. जागावाटपात काँग्रेसला नऊ, तर आम आदमी पक्षाला एक जागा सुटली आहे. केजरीवाल यांच्या पक्षाने तेथील प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील गुप्ता यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेसने अजून ताकास तूर लागून दिलेली नाही. निवडणुकीच्या आधीच त्या पक्षात उदासीचे वातावरण दिसत आहे. अजूनही उमेदवारांची घोषणा काँग्रेसला करता आलेली नाही. शिवाय पक्षाचे बडे नेते निवडणुकीला सामोरे जायलाच उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भीतीची सुप्त भावना या नेत्यांच्या मनात असल्याचे जाणवू लागले आहे. ( Lok Sabha Election 2024 )

Back to top button