Sandeshkhali Violence | अशा घटना घडत असतात, हा राष्ट्रीय चर्चेचा विषय नाही; संदेशखाली हिंसाचार प्रकरणी खर्गेंचे वक्तव्य

Sandeshkhali Violence | अशा घटना घडत असतात, हा राष्ट्रीय चर्चेचा विषय नाही; संदेशखाली हिंसाचार प्रकरणी खर्गेंचे वक्तव्य
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे काही दिवसांपूर्वी हिंसाचाराची (Sandeshkhali Violence) घटना घडली. तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख आणि इतरांविरोधात तेथे निदर्शने सुरू आहेत. संदेशखाली प्रकरणी राजकीय वातावरण तापले असताना "अशा घटना पश्चिम बंगालमध्ये घडत असतात, राष्ट्रीय चर्चेशी त्या संबंधित नाहीत," असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

मंगळवारी (दि. २७) 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते. संदेशखालीच्या घटनेबाबत (Sandeshkhali Violence) खर्गे यांना त्यांची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका काय? असे विचारले असता त्यांनी एमएसपी आणि शेतकऱ्यांवर बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, "आम्हाला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एमएसपीचे वचन दिले आहे. आमच्या पहिल्या घोषणेमध्ये आम्ही वचन दिले आहे की जर आमचे सरकार सत्तेवर आले तर आम्ही एएसपी कायदा करू," असे ते म्हणाले.

हा प्रश्न शेतकरी किंवा एमएसपीचा नसून संदेशखाली  येथील महिलांवरील अत्याचाराचा आहे, हे लक्षात आल्यावरही खर्गे यांनी या घटनेला राज्यस्तरीय पक्षीय राजकारण असून राष्ट्रीय चर्चेला योग्य नसल्याचे म्हणत बोलण्याचे टाळले. पुन्हा त्यांना तोच प्रश्न केला असता ते म्हणाले की, "मी तेथील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करतो." (Sandeshkhali Violence)

महिलांच्या हक्कांबाबत बोलताना खर्गे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशातील महिलांना मतदानाचा अधिकार दिला. त्याआधी ब्रिटन, फ्रान्स, अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. काँग्रेस पक्षाने राज्यघटना स्वीकारून महिलांसह सर्वांना मतदानाचा अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार स्थापन होताच एमएसपीची हमी

खर्गे म्हणाले की, "सरकारला शेतकऱ्यांबाबत काहीतरी करावे लागेल. शेतकऱ्यांना कायदेशीर हमीभाव देण्याचे आश्वासन दिले आहे. माझी पहिली घोषणा आहे की, युतीचे सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ. आम्ही जे काही करू शकतो ते सर्व करू."

'देश वाचवण्यासाठी संघटित व्हायला हवे'

"देशाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करणे योग्य नाही. आम्ही भारतीय आहोत. देशाला वाचवायचे असेल तर सर्वांना एकत्र येऊन संघटित व्हावे लागेल, असे खर्गे म्हणाले. राम मंदिराच्या प्रश्नावर खर्गे म्हणाले की, राजकारणात धर्म आणू नये. राजकारण आणि धर्म या वेगळ्या गोष्टी आहेत. धर्मावरचे राजकारण थांबले पाहिजे. देशात बेरोजगारी, महागाई यासह अनेक समस्या आहेत, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले.

संदेशखाली प्रकरण काय आहे?

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत आहेत. संदेशखालीमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख आणि इतर नेत्यांविरोधात निदर्शने सुरू आहेत. शेख आणि त्यांच्या समर्थकांनी गरिब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी काही महिला संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. भाजप सत्ताधारी टीएमसीविरोधात आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका वकील आलोक श्रीवास्‍तव यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news