Deepfake Case : डीपफेक प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासासह एक लाख रुपये दंड | पुढारी

Deepfake Case : डीपफेक प्रकरणात दोषी आढळल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासासह एक लाख रुपये दंड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सिनेअभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना आदेशवजा मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या अंतर्गत असलेल्या नियमांचा पुनरुच्चार करत मंत्रालयाने म्हटले आहे की माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम  ६६ डी नुसार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. (Deepfake Case)
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या मध्यस्थ नियमांनुसार, सोशल मीडिया प्लॅटफार्मला नियम आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे तसेच गोपनीयता धोरण आणि वापरकर्तासोबतचा कराराचे पालन करावेच लागेल. सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांना असा मजकूर पोस्ट करण्यापासून रोखावे लागेल त्याचबरोबर अशा सर्व मध्यस्थ सोशल मीडिया प्लॅटफार्मसला कोणत्याही सामग्रीच्या संबंधात तक्रार मिळाल्यापासून २४ तासांच्या आत कोणतीही सामग्री त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावी लागेल. (Deepfake Case)

रश्मिका मंदानाचा बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झारा पटेलचा होता, जो एडिट करण्यात आला होता आणि  पटेलचा चेहरा रश्मिका मंदानाच्या चेहऱ्याने बदलण्यात आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, डीपफेक व्हिडिओ हा चुकीच्या माहितीचा सर्वात धोकादायक प्रकार आहे.

या पार्श्वूमीवर मुळ व्हिडिओतील झारा पटेल हिने महिलांच्या भविष्याची काळजी वाटत असल्याचे म्हटले.  डीपफेक व्हिडिओशी माझा काहीही संबंध नसून जे घडत आहे त्यामुळे मी खूप व्यथित झाले आहे. या अशा प्रकरणामुळे स्त्रिया आणि मुलींमध्ये सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची भीती वाढेल त्यांच्या जीवनाशी खेळू नका कृपया एक पाऊल मागे घ्या अशी विनंती तिने केली आहे. तुम्हाला इंटरनेटवर जे काही दिसत आहे ते एकदा तपासून घ्या कारण इंटरनेटवरील प्रत्येक गोष्ट खरी नसते असा सल्ला झाराने दिला आहे.

अशा व्हिडिओंवर सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. अमिताभ बच्चन यांनीही हा व्हिडीओ शेअर करत यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी असे म्हटले आहे. रश्मिका मंदानाचा हा “डीपफेक” व्हायरल व्हिडिओ सर्वात मोठे आणि ताजे उदाहरण आहे.

डीपफेक व्हिडिओ कसा ओळखायचा?

जर्मनीतील संगणक शास्त्रज्ञ, आणि उद्योजक हाओ ली यांना डीपफेक तंत्रज्ञानाचे एक्सपर्ट म्हणून ओळखले जाते त्यांनी असे बनावट व्हिडिओ कसे ओळखायचे हे सांगितले आहे.  बनावट व्हिडिओमधील व्यक्तीचे गाल आणि कपाळ काळजीपूर्वक पहा. त्या व्यक्तीच्या पापण्या सामान्यपणे लुकलुकत नाही अनेकवेळा त्यात वेगाने डोळे मिचकावताना दिसतात. अशा व्हिडिओतील व्यक्तीच्या ओठांची हालचाल ऑडिओशी जुळत नाही.

Back to top button