Closing Bell | बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही चौफेर खरेदी, कोणते शेअर्स टॉप गेनर्स? | पुढारी

Closing Bell | बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही चौफेर खरेदी, कोणते शेअर्स टॉप गेनर्स?

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.३) सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स आज २८२ अंकांनी वाढून ६४,३६३ वर बंद झाला. तर निफ्टी ९७ अंकांच्या वाढीसह १९,२३० वर स्थिरावला. बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. बाजारातील तेजीत आयटी, ऑटो आणि मेटल सेक्टर आघाडीवर राहिले. ऑईल अँड गॅस आणि रियल्टी प्रत्येकी १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. (Closing Bell)

आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ४३० अंकांनी वाढून ६४,५०० वर पोहोचला. तर निफ्टी १३३ अंकांनी वधारून १९,२६६ वर गेला होता. त्यानंतर ही तेजी काही प्रमाणात कमी झाली.

संबंधित बातम्या 

‘हे’ शेअर्स टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स १ ते २ टक्क्यांदरम्यान वाढले. तर बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, मारुती हे शेअर्स घसरले.

झोमॅटोची कमाल

झोमॅटोचा शेअर्स आज ८ टक्क्यांहून अधिक वाढून ११६ रुपयांवर पोहोचला. सप्टेंबर तिमाहीत ३६ कोटी रुपयांच्या नफा कमावल्यानंतर झोमॅटो शेअर वधारला. झोमॅटोचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्यावर पोहोचले आहे.

कमाईच्या आकड्यांनी टायटनच्या शेअरने घेतली उसळी

टायटन कंपनीने शुक्रवारी सप्टेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीचे (Titan Q2 Results) आकडे जाहीर केले. टायटनने निव्वळ नफ्यात सुमारे १० टक्के वार्षिक (YoY) वाढ नोंदवली असून तो नफा ९४० कोटी झाला आहे. या पार्श्वभूमीवर टायटनचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर २.३५ टक्के वाढून ३,२७६ रुपयांवर पोहोचला. (Closing Bell)

Nifty वर काय परिस्थिती?

निफ्टी ५० वर अपोलो हॉस्पिटल्स, अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स, LTIMindtree आणि टायटन कंपनी यांचे शेअर्स वधारले. तर बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, इंडसइंड बँक आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांचे नुकसान झाले.

कोणते घटक ठरले महत्त्वाचे?

यूएस फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंड यांनी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी व्याजदराबाबत जैसे थे अशी भूमिका घेतली आहे. तसेच कमकुवत झालेला डॉलर इंडेक्स आणि बाँड यील्ड घसरल्याचा बाजाराला सपोर्ट मिळाला आहे.

अदानी पॉवरचे शेअर्स वधारले

अदानी पॉवरचे शेअर्स (Adani Power Share Price) शुक्रवारी एनएसईवर ५ टक्क्यांनी वाढून ३९३ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर ३८३ रुपयांवर राहिला. या कंपनीने गुरुवारी सप्टेंबर तिमाहीचे आकडे जाहीर केले होते. त्यात त्यांची कमाई मजबूत दिसून आली. या पार्श्वभूमीवर आज अदानी पॉवरचे शेअर्स वधारले.

जागतिक बाजार

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर जागतिक बाजारात तेजीचे वातावरण पसरले. दरम्यान, यूएस बॉन्डचे उत्पन्न घसरले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बाजारातील प्रमुख निर्देशांक सुमारे १.५ टक्क्यांनी वाढले. या तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजारातही सकारात्मक वातावरण राहिले.

परदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते

काल गुरुवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (Foreign institutional investors) भारतीय बाजारात निव्वळ विक्रेते राहिले. त्यांनी १,२६१ कोटीं रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,३८० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

तेल दरावर परिणाम

मध्य पूर्वतील इस्रायल-हमास संघर्षामुळे पुरवठा विस्कळीत होईल या चिंतेने शुक्रवारी तेलाच्या किमतीत थोडासा बदल झाला. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स १५ सेंटने वाढून प्रति बॅरल ८७ डॉलरवर गेले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्यूचर्स ०.३२ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८२.७२ डॉलर झाले.

हे ही वाचा :

Back to top button