बँकेने CIBIL Score तपासला तर त्याची माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक

बँकेने CIBIL Score तपासला तर त्याची माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक
Published on
Updated on

आपण जेव्हा कर्जाची मागणी करतो तेव्हा बँक आपला क्रेडिट स्कोअर तपासतात. हा क्रेडिट स्कोअर पूर्वाश्रमीचे कर्ज आणि त्याची परतफेड यावर आधारित असतो. या क्रेडिट स्कोअरच्या आधारे कर्जनिश्चिती होते. कर्जाची रक्कम, व्याजदर याचे आकलन होते. रिझर्व्ह बँकेच्या नव्या दिशानिर्देशानुसार बँकेकडून क्रेडिट स्कोअर हाताळला जाईल तेव्हा आपल्याला, ग्राहकाला तसा संदेश आणि मेल येणार आहे. याशिवाय सीबील स्कोअरबाबत तक्रार असल्यास त्याचे निवारण करताना सीआयसीकडून प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना मेल आणि संदेश पाठविला जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉरमेशन कंपनी (सीआयसी)ला दिलेल्या नवीन सूचनेनुसार, एखाद्या बँकेने किंवा आर्थिक संस्थेकडून ग्राहकाचा सीबील स्कोअर (CIBIL Score) किंवा क्रेडिट स्कोअर तपासला गेला, तर त्याचा अ‍ॅलर्ट ग्राहकाला मेलद्वारे आणि एसएमएसद्वारे पाठवणे बंधनकारक आहे. एवढेच नाही, तर बँकेकडून किंवा एखाद्या आर्थिक संस्थेकडून सीआयसीला संबंधित ग्राहकाच्या थकबाकीबाबत तसेच मागील काही देणी राहिल्यासंदर्भात अहवाल देत असेल, तर त्याचाही एसएमएस आणि मेल ग्राहकांना पाठवावा लागणार आहे. नवीन नियम सहा महिन्यांच्या आत लागू होणार आहेत.

क्रेडिट माहिती कंपन्या म्हणजे काय?

सीआयसी या देशभरातील व्यक्ती आणि कंपन्यांची खरेदी आणि व्यावसायिक क्रेडिटची माहिती ठेवण्यााचे काम करते आणि त्याचे विश्लेषण करत असते. या आधारावर सीआयसी ग्राहक आणि कंपनीचे मूल्यांकन करते आणि मागील क्रेडिटच्या इतिहासाच्या आधारवर व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर आणि कंपन्यांसाठी क्रेडिट रँकची गणना व निश्चिती करते. ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याला आकर्षक व्याजदरावर कर्ज मिळू शकते आणि स्कोअर खराब असेल म्हणजेच पूर्वाश्रमीच्या कर्जफेडीत कुचराई केलेली असेल, तर संबंधितास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळू शकत नाही. अर्थात कर्ज मिळणे किंवा न मिळणे हे केवळ क्रेडिट स्कोअरवरच अवलंबून असते असे नाही.

एखाद्या ग्राहकाला क्रेडिट स्कोअर हवा असेल तर…

अर्थात, क्रेडिट स्कोअर हा सीआयसीकडून मिळवता येऊ शकतो आणि त्यासाठी काही शुल्कही भरावे लागते. मात्र रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. कर्ज मिळविण्यासाठी क्रेडिट स्कोअरचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यात दुरुस्ती कशी करता येईल, हे सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले, सीआयसीकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा क्रेडिट रिपोर्ट (एफएफसीआर) हा प्रत्येक कॅलेंडर वर्ष (जानेवारी ते डिसेंबर)मध्ये एकदा मोफत सहजपणे उपलब्ध करून द्यावा. एफएफसीआरची लिंक सीआयसीच्या संकेतस्थळावर ठळकपणे दिसायला हवी, जेणेकरून एखादा व्यक्ती सहजपणे क्रेडिट स्कोअर पाहू शकेल. मात्र काही वेळा ग्राहकाला आपला क्रेडिट स्कोअर योग्य नसल्याचे वाटत नसेल तर काय करायला हवे? यासाठी सीआयआरमध्ये डेटा सुधारण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँका आणि एनबीएफसीने ग्राहकांना डेटा दुरुस्तीची विनंती नाकारण्याचे कारण सागांवे, जेणेकरून अशा ग्राहकांना सीआयआरमधील समस्या चांगल्या रितीने समजतील. विनंती का नाकारली जाते याची यादी सीआयसीकडून सर्व क्रेडिट संस्थांना पाठविण्यात यावी, अशी सूचना दिली आहे. तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान ग्राहक आणि सीआयसीकडून डेटा दुरुस्तीच्या मागणीला नकार देताना या यादीचा वापर करावा, असे नमूद केले आहे.

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ग्राहकांचा क्रेडिट स्कोर तयार करताना किमान सहा महिन्यांचा आधार असावा तसेच सीआयसीने तक्रारीच्या मूळ कारणांचे विश्लेषण करायला हवे. याशिवाय सीआयसीला बँका आणि एनबीएफसीकडून मिळालेल्या क्रेडिट डेटाची माहिती कॅलेंडरच्या सात दिवसांच्या आत डेटाबेसमध्ये नमूद करावी. ग्राहकांना या तक्रारीच्या निवारणासाठी होणार्‍या प्रक्रियेची वेळोवेळी मेसेज आणि मेलद्वारे सूचना दिली जावी, असेही म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news