पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून नकारात्मक संकेतांमुळे आज सलग तिसऱ्या सत्रांत शेअर बाजारात घसरण झाली. मुख्यतः इस्रायल- हमास युद्धाच्या (Israel-Hamas War) पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. यामुळे जगभरातील बाजारात कमकुवत स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटत आहेत. आज सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ६६,१६६ वर बंद झाला. तर निफ्टी १९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह १९,७३१ वर स्थिरावला. आज मेटल स्टॉक्स तेजीत दिसून आले.
संबंधित बातम्या
सेन्सेक्स आज ६६,२३८ वर खुला झाला. त्यानंतर तो ६६ हजारांपर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडिया, टीसीएस, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, सन फार्मा, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, कोटक बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले. तर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, एम अँड एम हे शेअर्स वाढले.
डीमार्टचे (Avenue Supermarts Share Price) शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ३,७७२ रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर हा शेअर सुमारे २ टक्के घसरणीसह ३,८६० रुपयांवर स्थिरावला. सप्टेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीतील कमाईचे आकडे समोर आल्यानंतर DMart चे शेअर्स घसरले. रिटेल साखळीतील ऑपरेटर असलेल्या DMart ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ६२३.३५ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा नफा ९ टक्क्यांनी कमी आहे.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपया ८३.२८ वर आला. डॉलरच्या तुलनेत एका वर्षातील रुपयाची ही निच्चांकी पातळी आहे. तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आणि मध्य पूर्वेत सुरु असलेल्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याच दरम्यान रुपयाची घसरण झाली आहे.
आज जागतिक बाजारात घसरण राहिली. गाझामधील तीव्र संघर्ष आणि युद्धाची व्याप्ती वाढणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. याचा परिणाम जगभरातील बाजारात दिसून येत आहे. आशियाई बाजारातील जपानचा निक्केई २२५ निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग हे निर्देशांक घसरले आहेत.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) शुक्रवारी १७ व्या दिवशी भारतीय बाजारात शेअर्स खरेदीसाठी पुढे आले. त्यांनी एका दिवसात ३१७ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले. गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरु होता. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी ९,७८४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी एका दिवसात १०३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
हे ही वाचा :