अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 97.55 अंक व 284.84 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 19751.05 अंक व 66280.47 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.50 टक्क्यांची, तर सेन्सेक्समध्ये 0.43 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांच्या समभागांमध्ये टाटा मोटर्स (7.2 टक्के), कोल इंडिया (7 टक्के), टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट (4.4 टक्के), ग्रासीम इंडस्ट्रीज (4.2 टक्के), मारुती सुझुकी (4.1 टक्के) यांचा समावेश होतो, तर सर्वाधिक घट होणार्‍या कंपन्यांमध्ये इन्फोसिस (-3.2 टक्के), एसबीआय (-3.1 टक्के), माईंड ट्री (-2.8 टक्के), अदानी पोर्टस (-2.1 टक्के), टेक महिंद्रा (-1.9 टक्के) यांचा समावेश झाला.

सप्टेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर (रिटेल इन्प्लेक्शन) 5.02 टक्क्यांपर्यंत खाली आली. रिझर्व्ह बँकेने ठरविलेल्या 6 टक्क्यांच्या पातळीवर सातत्याने दोन महिने राहिल्यावर सप्टेंबरमध्ये प्रथमच किरकोळ महागाई दर आटोक्यात आला. ऑगस्टमध्ये हा महागाई दर 6.83 टक्के होता. प्रामुख्याने अन्नधान्य महागाई दर ऑगस्टमधील 9.94 टक्क्यांवरून 6.56 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने किरकोळ महागाई दरात घट झाली. भारताच्या निर्मिती क्षेत्राचा (Manufacturing sector) निर्देशांक इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन (आयआयपी) मागील 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 10.3 पोहोचला. विद्युत उत्पादनात (Electricity Production) सर्वाधिक वाढ म्हणजेच 15.3 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

शुक्रवारच्या सत्रात खनिज तेलाच्या किमतीत (ब्रेटकू्रड) तब्बल 4 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. इस्रायल आणि गाझापट्टीवर चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रेट कू्रड 3.97 डॉलर प्रती बॅरल वधारून 89.97 डॉलर प्रती बॅरल किमतीवर पोहोचले. अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रूडदेखील 3.88 डॉलर प्रती बॅरल वधारून 86.79 डॉलर प्रती बॅरल किमतीवर पोहोचले. एकूण सप्ताहाचा विचार करता, गत सप्ताहात ब्रेंट क्रूड 6.3 टक्के वाढले. एप्रिलनंतर एकाच सप्ताहात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी ‘टीसीएस’चे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. मागील तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 2.4 टक्क्यांची वाढ होऊन निव्वळ नफा 11074 कोटींवरून 11342 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 59381 कोटींवरून 59692 कोटी झाला. कंपनीने 4150 रुपये प्रतिसमभाग दरावर 17 हजार कोटींच्या समभाग पुनर्खरेदीची (Share Buyback) योजना जाहीर केली. ‘टीसीएस’कडून 2017 नंतर पाचव्यांदा समभाग पुनर्खरेदी करण्यात आली आहे. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 23.2 टक्क्यांवरून 24.3 टक्क्यांवर पोहोचले.

‘भारती एक्सा लाईफ इन्श्युरन्स कंपनी’मधील ‘एक्सा’ लाईफ इन्श्युरन्स या फ्रान्सच्या कंपनीचा 49 टक्के हिस्सा भारती उद्योग समूह खरेदी करणार. या व्यवहारापश्चात भारती लाईफ व्हेंचर्स या प्रवर्तकाकडे ‘भारती एक्सा लाईफ कंपनी’चा 100 टक्के ताबा तयार होईल. सरकारी नियमकांकडून (रेग्युलेटर्स) सर्व परवानग्या मिळाल्यास डिसेंबरअखेर हा व्यवहार पूर्णत्वास येईल.

देशातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी ‘इन्फोसिस’चा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 4.5 टक्के वधारला. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत निव्वळ नफा 5945 कोटींवरून 6212 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 2.8 टक्के वधारून 38994 कोटींवर गेला. कंपनीने स्थिर चलन स्वरूपातील महसूल वाढीचा अंदाज (Constant Currency Revenue Growth) 1 ते 1.25 टक्क्यांदरम्यान वर्तवला आहे.

सिटी बँक ही अमेरिकेची बँक आपला चीनमधील रिटेल बँकिंग व्यवसाय एचएसबीसी या प्रतिस्पर्धी कंपनीला विकून टाकणार. सिटी बँक आपल्या सर्व ग्राहकांची खाती, व्यवस्थापनअंतर्गत मालमत्ता (असेट अंडर मॅनेजमेंट), पोर्टफोलिओ एचएसबीसी बँकेकडे सोपवणार. एकूण 3.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 30 हजार कोटी) ना व्यवहार होणार आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत हा व्यवहार पूर्णत्वास येईल.

एसआयपीद्वारे भारतीय भांडवल बाजारात येणार्‍या गुंतवणुकीचा ओघ विक्रमी 16 हजार कोटींच्या पातळीवर पोहोचला. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस् इन इंडिया’ (डॉम्फी) संस्थेच्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये एसअयपीद्वारे 16042 कोटींची गुंतवणूक शेअर बाजारात झाली. एकूण 3.67 दशलक्ष नव्या एसआयपीची नोंदणी सप्टेंबरमध्ये झाली. ‘एसआयपी’चे व्यवस्थापनअंतर्गत भांडवल बाजारमूल्य (एयूएम) 8 लाख 70 हजार कोटींवर पोहोचले. 30 सप्टेंबरअखेर एकूण म्युच्युअल फंड व्यवसायाचे व्यवस्थापनअंतर्गत भांडवल बाजारमूल्य 46 लाख 57 हजार कोटींवर पोहोचले.

अ‍ॅस्टर डीएम हेल्थ केअर ही हॉस्पिटल्सची शृंखला चालवणारी कंपनी खरेदी करण्यासाठी खासगी गुंतवणूकदार उद्योगसमूह ब्लॅकस्टोन आणि केकेआर उत्सुक. अ‍ॅस्टरची सध्या 33 हॉस्पिटल्स असून, शेकडो छोटे दवाखाने आणि औषधांची दुकाने आहेत. भारत तसेच आखाती देशात अ‍ॅस्टरचा व्यवसाय विस्तार आहे. भारतातील व्यवसायाचे सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 12 हजार कोटी) तसेच आखाती देशातील व्यवसायाचे 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.300 कोटी) असे एकूण 2.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 20500 कोटी)ना अ‍ॅस्टरचे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे.

देशातील महत्त्वाची आयटी कंपनी ‘एचसीएलटेक’चा चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचा नफा 8.4 टक्के वधारून 3832 कोटींवर पोहोचला. महसुलात 1.4 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 26672 कोटींवर गेला. महसूल वाढीचा अंदाज (Revenue Growth Guidence) 6-8 टक्क्यांवरून 5-6 टक्क्यांपर्यंत खाली आणला गेला. मागील 2 तिमाहीत सातत्याने महसुलात घट झाल्यावर या तिमाहीत प्रथमच महसुलात वाढ बघायला मिळाली.

रिलायन्स कॅपीटल या अनिल अंबानीच्या दिवाळखोर कंपनीला खरेदी करण्यासाठी ‘हिंदुजा उद्योग समूह’ 800 दशलक्ष डॉलर्सचा निधी खासगी गुंतवणूकदारांमार्फत उभा करणार. एकूण 1 अब्ज डॉलर्सचा (8300 कोटी) हिंदुजा समूह या व्यवहारासाठी विविध मार्गांनी निधी उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

‘इंडिगो’ एअरलाइन्सचे सहसंस्थापक ‘राकेश गंगावाल’ हे प्रतिस्पर्धी व सध्या अडचणीचा सामना करणारी ‘स्माईस जेट’ कंपनीमध्ये मोठा हिस्सा खरेदी करण्यास उत्सुक. सध्या गंगावाल यांचा इंडिगोमध्ये आपल्या पत्नीसह 16.22 टक्क्यांचा हिस्सा आहे.

एप्रिल ते जुलै या काळाचा विचार करता भारतातून परदेशात केल्या जाणार्‍या स्मार्ट फोनच्या निर्यातीत मोठी वाढ. भारतातून अमेरिकेला तब्बल 1.67 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 489.5 टक्के म्हणजेच सुमारे पाच पटींनी वाढ झाली. तसेच युनायटेड अरब इमिरेटस आखाती देशातील स्मार्टफोनची निर्यात 25.8 टक्के वधारून 836 दशलक्ष डॉलर्स झाली. भारतातून सर्व जगात एकूण 4.67 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 71 हजार कोटींचे) स्मार्ट फोन जुलैपर्यंत निर्यात करण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यात दुप्पटीने वाढल्याचे स्पष्ट होते.

देशातील खासगी क्षेत्रातील महत्त्वाची लाईफ इन्श्युरन्स कंपनी ‘एचडीएफसी लाईफ’चा नफा चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत 15 टक्क्यांनी वधारून 376 कोटी झाला. कंपनीकडे जमा होणार्‍या प्रिमियममध्ये तब्बल 28 टक्क्यांची वाढ होऊन प्रिमियम 11479 कोटींवरून 14755 कोटींवर पोहोचला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 4.76 लाख पॉलिसी विकल्या. मागील वर्षीच्या याच काळात 4.34 लाख पॉलिसी विकल्या गेल्या होत्या.

एसबीआय जनरल इन्श्युरन्सची मुंबई, पुणे महामार्ग तसेच पुणे- कागल महामार्ग यावर अपघातग्रस्तांना मदत करणे व अपघात रोखणे यासाठी सेव्ह लाईफ फाऊंडेशनसोबत भागीदारी ‘सीएसआर’च्या माध्यमातून कार्य कले जाणार.

भारताच्या विदेश चलन गंगाजळीत सलग 5 आठवड्यात घट. 6 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.17 अब्ज डॉलर्सनी घटून 584.74 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button