बँक लॉकरची सुविधा आणि ग्राहक

बँक लॉकरची सुविधा आणि ग्राहक
Published on
Updated on

सध्याच्या काळात लॉकर अत्यावश्यक असल्याने बहुतांश ग्राहक त्याचा वापर करतात. मात्र काही कारणास्तव अप्रिय घटना घडली तर नियमांवरून वाद-प्रतिवाद सुरू होतो. बँकेकडून नियमानुसार भरपाईची कारवाई केली जाते किंवा काहीवेळा टाळाटाळ केली जाते.

अलीकडेच उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये उंदराने खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला. हे रुपये एका महिलेने आपल्या बँक लॉकरमध्ये ठेवले होते. याबाबत बँक व्यवस्थापनाने पैसे लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, असे सांगितले; तर महिला म्हणते, लॉकरमध्ये पैसे ठेवता येणार नाही, असे आपल्याला बँकेने सांगितले नव्हते. यावरून बँक व्यवस्थापनाने चौकशीचे आदेश दिले आहेत, तर महिलेने नुकसान भरपाई मागितली आहे. अशाच रितीने आणखी एक प्रकार अंबाला येथे उघडकीस आला. चोरांच्या टोळीने बँकेच्या 32 लॉकरना टार्गेट केले आणि तेथील सामान धुऊन नेले. अशा वेळी बँकेकडून संबंधित ग्राहकास नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. पण बँकेकडून नियमानुसार भरपाईची कारवाई केली जाते किंवा काहीवेळा टाळाटाळ केली जाते. अशा प्रकारच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे लॉकरशी संबंधित नियम जाणून घेऊ.

कोणत्या वस्तू ठेवता येतात?

लॉकरची सुविधा घेणार्‍या ग्राहकांना लॉकरमध्ये दागिने, मौल्यवान परंतु लहान वस्तू तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांव्यतिरिक्त मनाई नसलेली कोणतीही वस्तू ठेवण्याची परवानगी आहे. एखादा व्यक्ती लॉकरमध्ये परवानगी नसलेली वस्तू ठेवत असेल, तर बँकेकडून तशी कृती थांबवली जाईल. याउपरही ग्राहकाने वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला तर बँकेकडून संबंधिताचे लॉकर बंद केले जाते.

कोणत्या वस्तूला मनाई?

बँक ग्राहक हा लॉकरमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र मग ते परवानाधारक का असेना, ते ठेवू शकत नाही. याशिवाय महागड्या वस्तू म्हणजे दुर्मीळ वस्तू, रोख रक्कम, औषधी, अमली पदार्थ तसेच परकी चलन आदी वस्तू लॉकरमध्ये ठेवत असेल तर ते कायदेशीरित्या चुकीचे आहे. ग्राहकांकडून मनाई असलेल्या वस्तू ठेवल्या जात असतील तर संबंधिताची लॉकरची सुविधा थांबविण्याचा बँकेला अधिकार आहे.

नुकसानीशी संबंधित नियम

एखाद्या खातेदाराच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू चोरीस गेल्या असेल किंवा बँकेच्या इमारतीला एखाद्या कारणाने हानी पोचत असेल आणि लॉकरमधील वस्तू खराब झाल्या असेल, तर ग्राहक हा बँकेच्या शाखेकडून भरपाई मिळवण्यास पात्र आहे. याशिवाय ग्राहकाने माहिती न देताच रोकड ठेवली किंवा अन्य प्रतिबंधित वस्तू ठेवून चूक केली असेल, तर त्या बदल्यात ग्राहकाला कोणतीही भरपाई दिली जात नाही. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचीदेखील कोणतीही भरपाई दिली जात नाही. कारण अशा प्रकरणात बँकेची कोणतीही चूक नसते.

किती मिळते भरपाई?

ग्राहकाचे लॉकरमधील सामान चोरीला जात असेल किंवा खराब होत असेल तर त्या बदल्यात बँकेकडून ग्राहकांना लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभर पटपर्यंत भरपाई दिली जाते. अनेकदा लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या तुलनेत लॉकरमधील साहित्य अधिक लाखमोलाचे असते. मात्र अशा प्रकरणात भरपाईची रक्कम ही वार्षिक भाड्याच्या एकूण शंभर पटच राहील, असा सर्वसाधारण नियम असतो. म्हणजेच वार्षिक भाडे दहा हजार रुपये असेल, तर त्याला शंभरपट अधिक म्हणजे दहा लाख रुपयेच भरपाई मिळेल.

लॉकर कधी निष्क्रिय होते

एखादा व्यक्ती लॉकर सलग सात वर्षांपर्यंत उघडत नसेल तर अशा प्रकारचे लॉकर हे बँक व्यवस्थापनाकडून निष्क्रिय म्हणून घोषित केले जाते. संबंधित ग्राहकाने दरवर्षी लॉकरचे नूतनीकरण केलेले असेल आणि शुल्क भरत असेल तरीही त्याचा वापर न केल्यास बँकेडून ते लॉकर निष्क्रिय मानले जाते. अर्थात, लॉकर निष्क्रिय करण्यापूर्वी बँकेकडून संबंधित खातेधारकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही संपर्क झाला नाही, तर बँक व्यवस्थापनाकडून संबंधित लॉकर हे दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत तोडले जाते आणि ते साहित्य काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते.

लॉकरच्या भाड्याशी संबंधित नियम

लॉकरच्या भाड्याशी संबंधित नियमांत काही महिन्यांपूर्वी बदल झाले आहेत. कोणतीही बँक ग्राहकांकडून कमाल तीन वर्षांचे भाडे एकाचवेळी घेऊ शकते. याशिवाय लॉकरचे किमान भाडे 1350 रुपये, तर कमाल 20 हजार रुपये राहू शकते. भाड्याची निश्चिती ही लॉकरच्या आकारावरून केली जाते. साधारणपणे बँकेत तीन किंवा चार आकाराचे लॉकर असतात. मोठ्या आकाराच्या लॉकरचे भाडे अधिक राहते.

स्टँप पेपरवर लॉकरचा करार

बँक ग्राहकांकडून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लॉकर करार करून घेते. अर्थात, काही बँका शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरही करार करतात. लॉकरमध्ये कोणत्या चीजवस्तू ठेवणार आहोत, याची माहिती लॉकर करारात नमूद करावी लागते. तसेच बँकेकडूनदेखील ग्राहकांना कोणत्या वस्तू ठेवू नयेत, याची माहिती दिली जाते. याशिवाय करारावर नॉमिनीचे संपूर्ण विवरण द्यावे लागते. लॉकरधारक नसल्यास बँक नॉमिनीचे व्हेरिफिकेशन करून लॉकरमधील सामान संबंधितांच्या हाती सोपविले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news