हमासने केलेला हल्ला दहशतवादी, पण पॅलेस्टाईन सार्वभौम : भारताची व्यवहारिक भूमिका | पुढारी

हमासने केलेला हल्ला दहशतवादी, पण पॅलेस्टाईन सार्वभौम : भारताची व्यवहारिक भूमिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धादरम्यान भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज (दि .12)दोन्ही राज्यांमधील शांततापूर्ण निराकरणासाठी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे समर्थन केले. यावेळी भारताने हमासचा हल्ला दहशतवादी असला तरी पॅलेस्टाईन हे सार्वभौम आहे, मात्र या सर्व परिस्थितीवर शांततेत मार्ग काढणे आवश्यक असल्याची भुमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मांडण्यात आली.

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राज्याच्या स्थापनेला भारताचा पाठिंबा असल्याचे सांगितले. पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राज्याच्या स्थापनेला भारत चर्चा करण्यास तयार असेल परंतु दहशदवाद कोणत्याही प्रकारे मान्य नसल्याचे बागची म्हणाले. आज (दि. १२) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत असताना बागची यांनी ही माहिती दिली.

अरिंदम बागची म्हणाले, भारताला एक सार्वभौम, स्वतंत्र आणि सुरक्षित पॅलेस्टाईन पाहिजे आहे. ज्यामध्ये मान्यताप्राप्त सीमारेषा असतील आणि त्या इस्रायलसोबत सहअस्तित्वात असतील. इस्रायल आणि पॅलेस्टीनी दहशतवादी संघटना यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान त्यांचे हे वक्तव्य आले आहे. दरम्यान हमासने केलेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणूनच भारत त्याकडे पाहतो असं मत बागची यांनी व्यक्त केले.

दरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी MEA मध्ये 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये दूरध्वनी क्रमांकांसह नियंत्रण कक्षाचा तपशीलही दिला.

Back to top button