Ranchi-Delhi flight | हे तर देवदूतच! विमानात बाळाचा श्वास थांबला, पण दोन डॉक्टरांनी केली कमाल… | पुढारी

Ranchi-Delhi flight | हे तर देवदूतच! विमानात बाळाचा श्वास थांबला, पण दोन डॉक्टरांनी केली कमाल...

पुढारी ऑनलाईन : रांचीहून दिल्लीला येत असलेल्या इंडिगो विमानात एक आश्चर्यकारक घटना घडली. रांची-दिल्ली विमानात दोन डॉक्टरांनी वेळेत उपचार करुन एका जन्मजात हृदयविकार असलेल्या सहा महिन्यांच्या बाळाला जीवदान दिले. रांचीहून दिल्लीला येत असलेल्या विमानात जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका मुलाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर याच विमानातून प्रवास करणाऱ्या दोन डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. (Ranchi-Delhi flight)

 संबंधित बातम्या 

या मुलाचे पालक त्याला उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) घेऊन जात होते. पण, विमान टेक ऑफ झाल्यानंतर बाळाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे पालक काळजीत पडले. त्यांना विमानातील सदस्यांना या परिस्थितीबद्दल माहिती दिली आणि विमानात कोणी डॉक्टर आहे का? हे शोधण्यासाठी विमानात अनांउन्समेंट करण्यात आली. त्यानंतर रांची येथील सदर रुग्णालयातील डॉक्टर डॉ. मोझम्मील फिरोज आणि आयएएस अधिकारी असलेले आणि डॉक्टर म्हणूनही प्रशिक्षण घेतलेले डॉ. नितीन कुलकर्णी मुलाच्या मदतीसाठी पुढे आले.

डॉक्टरांनी मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या मास्कचा वापर करून मुलाला ऑक्सिजनचा पुरवठा केला. त्यांनी वैद्यकीय तपासणीनंतर थिओफिलाइन इंजेक्शनसह इतर आपत्कालीन औषधेदेखील दिली. मुलाच्या पालकांनी सोबत डेक्सोना इंजेक्शन आणले होते, ज्यामुळे परिस्थिती आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती हाताळण्यात मदत झाली.

“बाळाची आई रडत होती. डॉ. मोझम्मिल आणि मी बाळाची चांगली काळजी घेतली. ऑक्सिजनचा पुरवठा प्रौढ वापरत असलेल्या मास्कद्वारे केला. कारण त्यावेळी बेबी मास्क किंवा कॅन्युला उपलब्ध नव्हते,” असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

आपत्कालीन औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतर बाळाच्या प्रकृत्तीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी सांगितले की पहिली १५-२० मिनिटे “अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तणावपूर्ण” होती. मात्र, काही वेळातच बाळाने हालचाल करत डोळे उघडले आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला.

आम्ही वैद्यकीय नोंदी तपासल्या. बाळ जन्मजात हृदयविकार, पेटंट डक्टस आर्टेरिओसस (पीडीए) ने त्रस्त होते,” असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. डॉक्टरांनी मुलाच्या पालकांना अगोदर उतरण्याची आणि लगेच त्यांना वैद्यकीय मदत देण्याची विनंती केली. तासाभरानंतर विमान उतरले आणि बाळाला वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.

“आम्ही विमानात मुलाला उपचार देण्यासाठी एका तासाहून अधिक वेळ प्रयत्न केले. त्यामुळे बाळाची बिघडलेली प्रकृती स्थिर झाली. याबद्दल आम्ही समाधानी आहोत,” असे कुलकर्णी. कुलकर्णी हे सध्या झारखंडच्या राज्यपालांचे प्रधान सचिव आहेत. (Ranchi-Delhi flight)

विमानातील या परिस्थितीचा साक्षीदार असलेल्या एका सहप्रवाशाने डॉक्टरांचे अभिनंदन करण्यासाठी X अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. “डॉक्टर हे देवाने पाठवलेले देवदूत आहेत. आज मी इंडिगो विमानात एका ६ महिन्यांच्या बाळाला वाचवताना पाहिले. झारखंडमधील गव्हर्नर हाऊसचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन कुलकर्णी यांनी त्यांचे डॉक्टर म्हणून कर्तव्य निभावले आणि त्यांनी बाळाला वाचवले. तुम्हाला सलाम, सर,” असे एएस देओल या प्रवासाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button