टाळूची त्वचा अन् कवटीच नसलेल्या बाळाला जीवदान | पुढारी

टाळूची त्वचा अन् कवटीच नसलेल्या बाळाला जीवदान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : टाळूची ४० टक्के त्वचा आणि कवटीदेखील पूर्णत: विकसित न झालेल्या अवस्थेत जन्म झालेल्या बाळावर बाई जेरबाई वाडिया मुलांच्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील एक विक्रमच मुंबईत नोंदवला गेला.

तमिळनाडूतील आफरीन आणि सनाउला खान या दाम्पत्याला झालेला बाळाच्या आगमनाचा आनंद फार काळ टिकला नाही. बाळाला मध्यल्या भागात टाळूची त्वचाच नव्हती. एवढेच नव्हे तर मेंदूला संरक्षण देणारी कवटीदेखील अनेक ठिकाणी नव्हती. साकी नाका येथील नर्सिंगहोममध्ये या बाळाचा जन्म जन्म होताच त्यास बाई जेरबाईवाडिया रुग्णालयात हलवण्यात आले.

वाडियातील प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन डॉ. नीलेश सतभाई म्हणाले. ‘अप्लासियाकटिसकॉन्जेनिटा’ नावाची ही दुर्मिळ विकृती आहे. या विकृतीसह क्वचितच बाळ जन्माला येते. यात कवटीच्या हाडांसह टाळूच्या त्वचेचा भाग विकसित होत नाही. परिणामी, मेंदूला झाकणाऱ्या कवटीचे संरक्षणात्मक स्तर तयार होत नाहीत. या बाळाच्या मेंदूचा महत्त्वाच्या भाग तर उघड दिसत होता. या मुलामध्ये, कवटीच्या शिरोबिंदूवरील त्वचा, मऊ ऊतक आणि हाडे गायबच होती.

मेंदूला झाकणारे ड्युरामॅटर उघडपणे दिसत होते. या परिस्थितीत संसर्ग किंवा मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. मेंदूतील मोठ्या रक्तवाहिन्यांना संसर्ग होऊ शकतो किंवा त्या फुटू शकतात. आम्ही या नवजात बाळावर त्याच्या जन्मानंतरच्या अवघ्या पाचव्या दिवशी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करून टाळूचा आणि कवटीचा भाग विकसित करण्यात आला. आणि या बाळाला पंधरा दिवसांत नवे आयुष्य मिळवून दिले. आता बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे.

  • जन्मतःच ४०% टाळूची त्वचा विकसित न झालेल्या ५ दिवसांच्या बाळावर पुनर्रचना करण्यात बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले.
  •  या बाळावर फेलॅप शस्त्रक्रिया करण्यात आली.
  •  ही शस्त्रक्रिया सुमारे ४ तास चालली आणि ती जिकरीची होती.
  •   टाळूची त्वचा आणि कवटीच्या आवरणाची नवनिर्मितीच या शस्त्रक्रियेत करण्यात आली.
  •  आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवून १४ दिवसांनी बाळाला घरी सोडण्यात आले.
  •  आता बाळाचे फॉलोअप सुरु असून त्याच्या जखमा बऱ्या झाल्या आहेत. बाळ आता एकदम तंदुरुस्त आहे.

Back to top button