वाळकी : शेतात टाकलेल्या नवजात बाळाला जीवदान | पुढारी

वाळकी : शेतात टाकलेल्या नवजात बाळाला जीवदान

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : एका निष्ठूर मातेने रात्रीच्या वेळी पाऊस चालू असताना शेतात टाकून दिलेल्या अवघ्या आठ ते नऊ दिवसांच्या नवजात बालकाला नगरमधील एका सहृदयी युवकामुळे जीवदान मिळाले. या घटनेमुळे ‘माता न तू वैरिणी’ अन् ‘देव तारी त्याला कोण मारी’ या दोन्ही म्हणींचा एकाच वेळी प्रत्यय आला आहे.

नगर शहरातील उपनगरात असलेल्या डॉन बॉस्को कॉलनीत राहणारे अमोल बाळू पाडळे हे बुधवारी (दि.19) रात्री अकराच्या सुमारास तातडीच्या कामानिमित्त एका मित्राला बरोबर घेऊन दुचाकीवर पुण्याला जाण्यासाठी नगरमधून निघाले. रात्री 11.30 च्या सुमारास चास (ता.नगर) शिवारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे गेल्यावर ते रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी त्यांना एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला.

एवढ्या रात्री एका सुनसान ठिकाणी बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने ते काहीसे दचकले. मात्र, पुन्हा आवाज कोठून येतोय, हे पाहण्यासाठी त्यांनी मोबाईलची टॉर्च लावून शोध घेतला. त्यावेळी त्यांना रस्त्यालगत असलेल्या शेतात एक आठ ते नऊ दिवसांचे बाळ दिसले. त्यांनी तातडीने त्या बाळाकडे धाव घेतली व मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्यांनी पाहिले असता ते बाळ पावसाने भिजलेले होते. गारठून आणि भुकेने व्याकूळ होऊन टाहो फोडून रडत होते.

त्या बाळाची ही अवस्था पाहून अमोल पाडळे यांनी पुण्याला जाण्याचे रद्द करत, त्या बाळाला घेऊन थेट त्यांचे नगरमधील घर गाठले. घरी त्यांच्या पत्नीला त्यांनी ही हकीकत सांगितल्यावर, त्यांनी त्या बाळाला मायेने जवळ घेत अगोदर त्याला दुपट्यात गुंडाळून गरम शेक दिला. दूध गरम करून त्याला चमच्याने पाजले. तरीही ते बाळ रडायचे थांबेना. मग त्यांच्या लक्षात आले की त्याची मान अवघडलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्याचा औटाळा काढत मालिश केली. तेव्हा कुठे ते बाळ शांत झाले व खेळू लागले. रात्रभर अमोल पाडळे व त्यांच्या पत्नीने त्या गोंडस बाळाची सुश्रुषा केली.

त्यानंतर गुरूवारी (दि.20) सकाळी ते त्या बाळाला घेऊन स्नेहालय संचलित स्नेहांकुर संस्थेत गेले. तेथे चाईल्ड लाईनच्या मंजुषा गावडे, राहुल कांबळे, स्नेहांकुरच्या प्रतीक्षा आव्हाड यांनी त्यांना बरोबर घेऊन नगर तालुका पोलिस ठाणे गाठले. तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी अमोल पाडळे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.

सहायक निरीक्षक देशमुख यांच्या सूचनेनुसार बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला महिला व बाल विकास समितीकडे सोपविण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचारी विक्रांत भालसिंग, आदिनाथ शिरसाठ, ताराबाई वाव्हळ, अर्चना जायभाय आदी उपस्थित होते. पोलिस नाईक गायत्री धनवटे याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात त्या बाळाच्या अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

पुणे : घरफोड्यांत अकरा लाखांचा ऐवज चोरीला ; बंद सदनिका चोरट्यांच्या टार्गेटवर

नाशिक मनपा आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर

अहमदनगर : दुहेरी हत्याकांडातील सहा आरोपी जेरबंद

Back to top button