पारगाव : जाळीत अडकलेल्या चिमणीला जीवदान | पुढारी

पारगाव : जाळीत अडकलेल्या चिमणीला जीवदान

पारगाव(ता. आंबेगाव ); पुढारी वृत्तसेवा : पक्ष्यांपासून संरक्षणासाठी द्राक्षबागेला लावलेल्या जाळीत अडकलेल्या चिमणीला मंचर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी जीवदान दिले. ही घटना नागापूर येथे शनिवारी (दि.28) सकाळी दहाच्या सुमारास घडली. चिमणीने सुटकेनंतर आकाशामध्ये उंच भरारी मारली.

नागापूर येथील श्री क्षेत्र थापलिंग गडाच्या पश्चिमेला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांची द्राक्षबाग आहे. बागेचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी चोहोबाजूंनी जाळी लावली आहे. शनिवारी (दि.28) सकाळी एक चिमणी त्या जाळीत अडकली होती. नेहमीप्रमाणे सभापती देवदत्त निकम हे बागेमध्ये पाहणीसाठी गेले असता त्यांच्या दृष्टीस अडकलेली चिमणी पडली.

चिमणीचे पंख आणि दोन्हीही पाय जाळीत पूर्णपणे अडकून गुंतागूंत झाल्याने तिला हातांनी सोडवणे कठीण होते. निकम यांनी कात्रीच्या साह्याने सावकाशपणे जाळी कट केली. त्यानंतर चिमणीची सुखरूपपणे सुटका झाली. सुटका झाल्याने चिमणीने आकाशात उंच भरारी घेतली. सभापती देवदत्त निकम यांचे या कृत्याबद्दल पक्षिप्रेमींकडून कौतुक होत आहे.

Back to top button