पुणे: भिगवणच्या मातीत माणुसकी ओशाळली,आणि जन्मलीही, गर्भवतीला एका डॉक्टरने टाकून दिले दुसऱ्या डॉक्टरने जीवदान दिले..! | पुढारी

पुणे: भिगवणच्या मातीत माणुसकी ओशाळली,आणि जन्मलीही, गर्भवतीला एका डॉक्टरने टाकून दिले दुसऱ्या डॉक्टरने जीवदान दिले..!

भिगवण, पुढारी वृत्तसेवा: सोमवारची मध्यरात्र कर्नाटक मधील ती महिला आणि तिचे नातेवाईक आयुष्यभर विसरणार नाहीत. कारण मरणप्राय कळा येत असताना या संकटातील देवदूत डॉक्टर दवाखान्याचा दरवाजा उघडत नाही आणि दुसरीकडे अत्यंत वेळी एक डॉक्टर कशाचीही परवा न करता मध्यरात्री दोन वाजता देखील धावत पळत येतो. भिगवणच्या मातीने सोमवारी माणुसकी ओशाळलेली सुद्धा पाहिली आणि नव्याने माणुसकीचा अंकुर जन्मताना देखील पाहिला. प्रवासात असलेल्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्याची घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली, व्यवस्थेच्या डोळ्यात जळजळीत अंजन यामुळे टकाले गेले हे मात्र खरे !

कर्नाटककडे पुण्याहून एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून गर्भवती महिला आणि तिचे नातेवाईक प्रवास करत होते. मात्र या गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्या आणि त्या असह्य कळा पाहून त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती केली. खासगी बसच्या चालकाने भिगवण नजीक गाडी आली असता सागर हॉटेल समोरील एका हॉस्पिटल समोर गाडी थांबवली आणि तिथेच या महिलेला आणि त्याचे नातेवाईकांना सोडून बस चालक निघून गेला.

या महिलेची अवस्था पाहून स्थानिक रेहान तांबोळी व हजारी देवाशी यांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्या हॉस्पिटल समोर या महिलेला उतरवले होते, त्या हॉस्पिटलच्या दरवाजा उघडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र, या हॉस्पिटलचा दरवाजा उघडलाच नाही.

अखेर तिच्या कळा आणखी वाढत गेल्या, मग सरकारी यंत्रणेकडे देखील दाद मागितली, सरकारी रुग्णवाहिका मिळते का त्याचाही प्रयत्न स्थानिकांनी केला. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ॲम्बुलन्स चालक केतन वाघ हे या नातेवाईकांच्या मदतीला धावले. त्यांनी देखील प्रयत्न केला आणि शेवटी लाईफ लाईन केअर हॉस्पिटल मधील डॉ. योगिता भोसले यांना संपर्क साधताच त्या अवघ्या पाच मिनिटात तिथे पोहोचल्या. तोपर्यंत या महिलेची प्रसूती झाली होती. मात्र, त्यानंतरच्या सर्व सोपस्कार डॉ. योगिता भोसले यांनी व्यवस्थितरित्या पार पाडले आणि महिला आणि बाळ सुखरूप झाल्यानंतर त्यांना घेऊन लाईफ लाईन केअर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

मध्यरात्री घडलेली ही घटना तशी पाहिली तर अनेकांच्या वाट्याला येऊ शकते. आडवाटेने किंवा ज्या ठिकाणी कोणतीही ओळख नाही अशा ठिकाणी घडणाऱ्या अशा घटना अनेकांच्या स्मरणात कायमच्या राहतात, मात्र ज्या दवाखान्याने, ज्या डॉक्टरने त्याचा दवाखानाच उघडला नाही, त्याच्यावरती काय कारवाई होणार हा प्रश्न मात्र सर्वांनाच अनुत्तरीत करून गेला.

Back to top button