पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची सूर्यमोहीम 'आदित्य-L1'ला मोठे यश मिळाले आहे. आदित्य-एल १ यान पृथ्वीच्या प्रभाव कक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडले आहे. तसेच त्याने त्याचा पुढील प्रवास देखील सुरू केला आहे. 'आदित्य-एल १' पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून यशस्वीरित्या निघून गेले असून, ते सूर्य-पृथ्वीमध्ये असलेल्या लॅग्रेंज पॉइंट-1 (L1) कडे यशस्वी मार्गक्रमण करत आहे. अशी माहिती भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 'X' अकाऊंटवरून दिली आहे. (Aditya-L1 Mission Updates)
आदित्य-L1 या यानाने पृथ्वीपासून 9.2 लाख किलोमीटर अंतर पार केले असून, ते पृथ्वीच्या प्रभाव कक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडले आहे. या यानाने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत, यानाने सूर्य-पृथ्वीमधील लॅग्रेंज पॉइंट-1 (L1) च्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यास सुरूवात केली आहे.
पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. प्रथम मंगळयानावेळी मार्स ऑर्बिटर मिशनवेळी पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर यान पाठवण्यात आले असल्याचे देखील इस्रोने 'X' वरून केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले होते.
यापूर्वी आदित्य-L1 ने पृथ्वीपासून ५० हजार किमी अंतरावरून डेटा पाठवायला सुरूवात केली होती. आदित्य एल-१ वर असलेल्या STEPS उपकरणाने डेटा गोळा करण्यास सुरूवात केली होती. या उपकरणाने ५० हजार किलोमीटर अंतरावरून सुपरथर्मल-एनर्जेटिक आयन आणि इलेक्ट्रॉन्सचा अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे या कणांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे समजण्यास वैज्ञानिकांना मदत होईल. ते अभ्यास करू शकतील, असेही इस्रोने सांगितले होते.
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एकूण ५ लॅगरेंज पॉईंट आहेत. या पॉईंटवर सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीतील गुरुत्वाकर्षण एखाद्या लहान वस्तूचे सेंट्रिफ्युगल फोर्स (अपकेंद्री बल) संतुलित ठेवते. त्यामुळे ही लहान वस्तू या सूर्य आणि पृथ्वीच्या अनुषंगाने स्थीर राहाते.
लॅगरेंज पॉईंट १ हा पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. सूर्याची पृथ्वीभोवतीची जी कक्षा आहे, त्यावर हा लॅगरेंज पॉईंट १ आहे.
सूर्याच्या अभ्यासासाठी लॅगरेंज पॉईंट १ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या पॉईंटवरील कोणतीही वस्तू सूर्य-पृथ्वीच्या अनुषंगाने स्थिर राहाते. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षणातील परस्पर संबंधातून ही स्थिरता येते, त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रीय संशोधनासाठी हा पॉईंट महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी Solar and Heliospheric Observatory याच ठिकाणी आहे. येथून सूर्याच्या दर्शन सातत्याने होत राहाते, पृथ्वीवरील वातावरण, पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीचे चक्र याचा यावर परिणाम होत नाही. आदित्य L1वरील सातपैकी ४ पेलोड सूर्याच्या दिशेने आहेत, तर ३ पेलोड विविध प्रयोग करतील, त्यामुळे सूर्यमालेतील सूर्याच्या विविध अंगाने शास्त्रीय माहिती मिळणार आहे.