पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या सूर्यमोहिमेसंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मोठी अपडेट दिली आहे. आदित्य एल १ अंतराळ यानातील सुप्रा थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) उपकरण कार्यरत झाले आहे. यामध्ये सहा पेलोड (सेन्सर्स) असून, त्यातील सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोड हा कार्यान्वित झासा आहे. या सेन्सरने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे, अशी पोस्ट इस्रोने 'X' वरून शेअर केली आहे. (Aditya-L1 Mission Updates)
इस्रोने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदित्य- एल१ मधील STEPS या उपकरणाने पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा अधिक दूर अंतरावरील सुप्रा-थर्मल आणि ऊर्जा आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करेल. ही आकृती वातावरणातील ऊर्जाकणाची भिन्नता दर्शविते. तसेच एका विशिष्ट युनिटद्वारे हे ऊर्जाकण गोळा केले जातात, असेही 'इस्रो'ने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Aditya-L1 Mission Updates)
आदित्य एल-1 यानामधील सुप्रा थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) उपकरणामध्ये सहा सेन्सर्स आहेत. प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतात आणि सुप्रा थर्मल आणि उर्जेचे 20 keV/न्यूक्लिओन ते 5 MeV/न्यूक्लिओन पर्यंतचे आयन मोजतात. हे मोजमाप कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो, असेही इस्रोने वेबसाईटवर दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
आदित्य एल-1 मधील सुप्रा थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावर सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या त्रिज्येच्या 8 पट पेक्षा जास्त आहे.आवश्यक उपकरणांच्या आरोग्य तपासणी पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावर जाईपर्यंत डेटा संकलन सुरूच राहिल असेही इस्रोने म्हटले आहे.
सूर्य मोहिमेच्या माध्यमातून 'इस्रो' सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्याच गोष्टींचा अभ्यास करणे 'इस्रो'ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास 'आदित्य एल-1' करणार आहे. त्याखेरीज सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील, अशी अपेक्षा आहे. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. 'आदित्य एल-1'चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. 'चांद्रयान-3'प्रमाणेच 'आदित्य एल-1' सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून 'एल-1' पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्या मारताना 'आदित्य एल-1' सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल. (Aditya L1 Launch)