Aditya-L1 Mission | ‘आदित्य एल-१’ : आज सूर्यमोहीम; जाणून घ्या याविषयी | पुढारी

Aditya-L1 Mission | 'आदित्य एल-१' : आज सूर्यमोहीम; जाणून घ्या याविषयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या पहिल्या सौर मोहीमेला आज २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुरूवात होईल. त्यासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. इस्रोच्या आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रामधून ‘आदित्य एल-१’ या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रक्षेपणासाठी रॉकेट आणि उपग्रह सज्ज असल्याची माहिती इस्रोच्या प्रमुखांनी दिली असून, या मोहिमेसाठी काउंटडाऊन सुरू आहे, (Aditya-L1 Mission) याची माहिती देखील इस्रोने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे,

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी लँडिंगनंतर यशाच्या शिखरावर आहे. दरम्यान, भारत आता सूर्यमोहिमेच्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. या सूर्यमोहीमेत सूर्याचा अभ्यास आणि संशोधन हे मुख्य उद्दीष्ट्य आहे. ‘आदित्य एल-१’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. गुरुवारी, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अंतराळ संस्था या प्रक्षेपणासाठी सज्ज असून, ‘आदित्य एल-१’ यानाच्या प्रक्षेपणासाठी काउंटडाऊन सुरू (Aditya-L1 Mission) आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून ‘पीएसएलव्ही-एक्सएल’ या महाबली रॉकेटच्या माध्यमातून ‘आदित्य एल-१’ अंतराळात पाठवले जाईल. ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ही पहिली सौरमोहीम आहे. मोहिमेंतर्गत येत्या ४ महिन्यांत (१०० ते १२० दिवस) पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावर ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या प्रभामंडळातील ‘एल-1’ बिंदूवर पोहोचणार (Aditya-L1 Mission) आहे, असेही इस्रोने सांगितले होते.

Aditya-L1 Mission: भारताच्या ‘आदित्य एल-१’ मिशनचा उद्देश काय?

‘आदित्य एल-१’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय मोहीम आहे.

सूर्याजवळची सुरक्षित कक्षा ही पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारताचे ‘आदित्य एल-१’ हे यान L1 पॉइंटवर स्थिरावेल. येथूनच विविध निरीक्षणे नोंदवेल.

भारताची ही मोहीम सूर्याची गती आणि त्याच्यावर असणार्‍या हवामानाची माहितीची उकल करण्यास मोलाची ठरणार आहे.
‘आदित्य-एल वन’ अंतरिक्ष यानात सात सुसज्ज उपकरणे बसवलेली आहेत. ही उपकरणे सूर्यावरचा थर, सौरमंडळ आणि ‘क्रोमोस्फियर’संदर्भात अंतर्गत आणि बाह्य थरांचा तपास करणार आहे.

सूर्याच्या कक्षेत आणि सूर्यावर घडणार्‍या सर्व घडामोडींचा अभ्यास करणे आणि डेटा गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
सौरवादळांचा स्रोत काय, तीव्रता काय, परिणामकारता काय, या सगळ्यांचे गणित देखील या मोहिमेत मांडले जाणार आहे.

प्रखर सूर्याकडे आपण सहज पाहू शकत नाही. परंतु, ‘आदित्य एल-१’ हे यान सूर्याच्या प्रखर प्रकाशाचा सामना करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या मोहिमेचे मूळ ध्येय हे सूर्याला जवळून पाहण्याचे आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.

‘आदित्य एल-१’ मिशनचे बजेट किती?

भारताच्या आदित्य एल-1 मिशनसाठी केंद्र सरकारकडून ४ कोटी ६० लाख मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, इस्रोकडून या मोहिमेवर साधारण ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा अंदाज आहे. परंतु इस्रोने या खर्चाबाबत कोणतेही अधिकृत अपडेट दिलेली नाही. या मोहिमेची सुरूवात डिसेंबर, २०१९ पासून करण्यात आली आहे, असे देखील इस्रोने म्हटले आहे.

 आदित्य-L1 मोहीम भारतासाठी का आहे महत्त्वाची?

चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यानंतर ‘आदित्य एल-१’ मिशन यशस्वी झाल्यास भारताच्या अंतराळ संशोधनातील हे उल्लेखनीय यश असणार आहे.

जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर ‘आदित्य एल-१’ हे अंतराळ यान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती हेलो ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल.

सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या पॉइंट एल-१ वरून सूर्याचे निरीक्षण करता येणार आहे. तसेच याचवेळी पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या आसपासच्या पर्यावरणीय परिस्थितीचा देखील अभ्यास करता येणार आहे.

इस्रोची ही सूर्यमोहिम पृथ्वीच्या हवामानाचा इतिहास आणि सूर्याच्या क्रियांचा पृथ्वीसह इतर ग्रहांच्या वातावरणावर होणारा प्रभाव शोधण्यासही मदत करणार आहे.

आत्तापर्यंत इतर देशांनी राबवलेल्या सौर मोहिमा

आतापर्यंत अमेरिका, युरोपीय अंतराळ संस्था आणि जर्मनीने सूर्याच्या अभ्यासासाठी मोहीम आखली आहे. यामध्ये सूर्याच्या चुंबकीय क्षेत्र मोजण्यात आले आहे. अशा रीतीने सुमारे वीसपेक्षा अधिक मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.

चीनकडे पृथ्वीभोवती फिरणारे असे दोन अवकाशयान आहेत. गेल्यावर्षी चीनने कोरोनल मास इजेक्शनचा तपास करण्यासाठी सौर मिशन पाठवले आहे.

नासा आणि युरोपीन संशोधन संस्थेकडून एकत्रितरित्या सौर आणि हेलिओस्फेरिक सौरमोहीम राबवण्यात आली होती. ही मोहिम भारताच्या इस्रोप्रमाणेच लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती ठेवण्यात आली आहे.

अमेरिकेच्या नासाने २०२१ मध्ये पार्कर सोलर प्रोबसह इतर सौर मोहिमा र्याच्या कोरोना किंवा वरच्या वातावरणात पाठवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button