पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ८०० हून अधिक अंकांनी म्हणजेच १.२० टक्क्यांनी घसरून ६६,८०० च्या खाली आला. तर निफ्टीही १.२१ टक्के घसरणीसह १९,९०० च्या खाली आला. त्यानंतर सेन्सेक्स ७९६ अंकांनी घसरून ६६,८०० वर बंद झाला. तर निफ्टी २३१ अंकांच्या घसरणीसह १९,९०१ वर स्थिरावला. (Sensex crash) क्षेत्रीय पातळीवर पॉवर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बँक, मेटल आणि रियल्टी प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३० टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला.
मुख्यतः आजच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस या हेवीवेट शेअर्सना फटका बसला. दरम्यान, आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.२५ लाख कोटींनी कमी होऊन ३२०.७५ लाख कोटींवर आले. याआधीच्या सत्रात ते ३२३ लाख कोटी रुपये होते.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयापूर्वी यूएस ट्रेझरी बाँड्स उत्पन्न १६ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. दरम्यान, भारतीय रुपया सोमवारच्या ८३.२७ च्या तुलनेत बुधवारी १९ पैशांनी वाढून ८३.०८ प्रति डॉलरवर बंद झाला.
संबंधित बातम्या
सेन्सेक्स आज ६७,०८० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६,७२८ अंकांपर्यंत खाली आला. आजची सेन्सेक्सची घसरण ही १ टक्क्यांनी अधिक आहे. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर ३.५८ टक्क्यांनी घसरून १,५७९ रुपयांवर आला. जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स हे शेअर्सही प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. अल्ट्राटेक, भारती एअरटेल, मारुती, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, विप्रो हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी खाली आले. हिंदुस्तान युनिलिव्हर, एलटी, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह या शेअसनी लाल चिन्हात व्यवहार केला. तर केवश पॉवर ग्रिड, आयटीसी, एम अँड एम, एनटीपीसी, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक हे शेअर्स वाढले होते.
निफ्टी ५० निर्देशांक १९,९८० वर खुला झाला होता. त्यानंतर निफ्टी १९,८७८ पर्यंत खाली घसरला. निफ्टीवर एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, बीपीसीएल आणि एसबीआय लाईफ २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर पॉवर ग्रिड, कोल इंडिया, ओएनजीसी, बजाज ऑटो हे वाढले. (Sensex crash)
यूएस ट्रेझरी उत्पन्न १६ वर्षांच्या उच्चांकावर गेले आहे. कारण तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढली आहे. यावरुन अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळ उच्च व्याजदरवाढ जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील स्टॉक्सना संघर्ष करावा लागला. जपानचा निक्केई ०.२ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेच्या बाजारातील एस अँड पी ५०० निर्देशांक ०.२ टक्क्यांनी खाली आला. बेंचमार्क १० वर्षीय ट्रेझरी उत्पन्न २००७ पासून त्यांच्या सर्वोच्च पातळीवर ४.३७१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) सोमवारी निव्वळ आधारावर १,२३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ५५३ कोटींचे शेअर्स खरेदी केले.
हे ही वाचा :