NSE Nifty 50 Index | बँक एफडीपेक्षा ५ टक्क्यांनी जास्त परतावा, जाणून घ्या निफ्टीमधील गुंतवणुकीविषयी | पुढारी

NSE Nifty 50 Index | बँक एफडीपेक्षा ५ टक्क्यांनी जास्त परतावा, जाणून घ्या निफ्टीमधील गुंतवणुकीविषयी

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

शेअर मार्केटमध्ये सध्या तेजीचे दिवस आहेत. आपल्या देशातील निफ्टी म्हणजे देशातील प्रथम 50 कंपन्यांचे सरासरी मूल्य होय. आज निफ्टीने 20000 चा आकडा पार केलेला आहे. आजपर्यंतचा हा सर्वोच्च स्तर गाठला आहे. गेल्या चार- पाच महिन्यांत मार्केटमध्ये सातत्याने तेजी चालू असून, सेन्सेक्सने 67,500/- पातळी ओलांडली आहे. शेअर मार्केटमध्ये तेजी असल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओने भरभरून परतावा दिलेला आहे. (NSE Nifty 50 Index)

मार्च 2023 नंतर FII परदेशी गुंतवणूकदाराकडून सुमारे एक लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी निर्माण झाली आहे. आपल्या देशातील प्रमुख निर्देशांकापैकी निफ्टी निर्देशांकाची सुरुवात 1996 साली 1000 अंकांनी झाली होती. ती आज वीस हजारांवर पोहोचली आहे. म्हणजे 1996 साली निफ्टीमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे. त्यांचे आज वीस लाख झालेले आहेत. सरासरी परतावा हा 12 टक्क्यांनी मिळालेला आहे. जो बँक एफडीपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे.

निफ्टीचा इतिहास पाहिला असता, 1996 साली 1000 अंकांची सुरुवात 2002 साली 1017 अंकांवर गेली. पहिली सहा वर्षे काहीच परतावा दिला नाही. 2008 साली 6143 अंकांवर पोहोचला. 2002 ते 2008 या सहा वर्षांत सहा पटीने पैसे वाढले. म्हणजे 32% नी परतावा दिला आहे. पहिली सहा वर्षे बाजाराने मंदी दाखविली आहे, नंतरच्या पाच वर्षांत मोठी तेजी दिली आहे. 2017 साली निफ्टीने 10,000 चा टप्पा पार केला आहे. 2002 ते 2017 या 15 वर्षांत 1000 वरून 10000 निफ्टी झाला आहे. या कालावधीत दहापट पैसे झाले आहेत. या काळात निफ्टीने 16% परतावा दिला आहे, 2017 नंतर 10 हजारवरून 2023 साली सध्या 20 हजारांचा टप्पा गाठला आहे. सहा वर्षांमध्ये दुप्पट पातळी गाठली.

1996 ते 2023 अखेर 1 हजार ते 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. या 27 वर्षांच्या काळात निफ्टीने सरासरी 12% परतावा दिला आहे. या काळातील इतर ठिकाणच्या गुंतवणुकीचा विचार केला असता बँक गुंतवणूक 8%, तर पीपीएफने 9%, पारंपरिक विमा योजनेने 6% व सोन्याने 8.5% दराने परतावा दिला आहे. महागाई आणि आयकराचा विचार करता उलट नुकसान झाले आहे. भांडवली बाजारात तेजी आणि मंदी दोन्ही गोष्टी अल्पकाळासाठी आहेत.

सातत्याने गुंतवणूक आणि दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार केला असता, या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरते. यापुढेही बाजार असाच परतावा देणार आहे. याचे कारण असे, 2013 साली 2 कोटी 10 लाख डीमॅट खाती होती. मार्च 2023 अखेर 11.6 कोटी झाली आहेत. याचा अर्थ, भारतीय शेअर बाजारात मागील दहा वर्षांत पाच पटीने डीमॅट खाती संख्या वाढली आहेत. प्रत्येक महिन्यात लाखोंच्या संख्येने खाती वाढत आहेत. (NSE Nifty 50 Index)

आज आपल्या देशामध्ये 142 कोटी लोकसंख्या असून, सध्या 11 कोटी डीमॅट अकाऊंट खाती आहेत. याचा अर्थ, देशाच्या एकूण लोक संख्येच्या तुलनेत फक्त 7% लोक या भांडवली बाजारात उतरले आहेत. भविष्यात दहा ते वीस वर्षांच्या कालावधीत 40 ते 50% लोकांची डीमॅट खाती उघडतील तेव्हा मार्केटमधील उलाढाल कित्येक पटीने वाढलेली पाहावयास मिळेल.

Back to top button