RBI च्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची फेरनियुक्ती | पुढारी

RBI च्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची फेरनियुक्ती

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) गव्हर्नरपदाबाबत मोठा निर्णय घेतलाय. आज (२९. ऑक्टो) कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिली आहे. आता पुढील ३ वर्षे शक्तीकांत दास आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करणार आहेत.

शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपणार होता. तत्पूर्वीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला. शक्तीकांत दास याआधी अर्थमंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांची ११ डिसेंबर २०१८ रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली.

२०२४ पर्यंत आरबीआयच्या गव्हर्नरपदावर राहणार 

शक्तीकांत दास यांच्या फेरनिुयक्तीने ते डिसेंबर २०२४ पर्यंत या पदावर काम करतील. त्यांनी यापूर्वी अर्थविभाग, करप्रणाली, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शक्तीकांत दास यांनी याआधी जागतिक बँक, आशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक या ठिकाणी भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे.

अर्थमंत्रालयात असताना त्यांनी जवळपास ८ अर्थसंकल्प तयार करण्यात थेट भूमिका निभावलेली आहे. दास यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शक्तीकांत दास यांची उर्जित पटेल यांच्या जागेवर आरबीआयचे गव्हर्नरपदी (RBI) नियुक्ती झाली होती. उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या स्वायत्तेबद्दल सरकारशी झालेल्या मतभेदांनंतर तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. यानंतर शक्तीकांत दास यांची नियुक्ती झाली.

पहा व्हिडिओ : पाठांतरामध्ये गावडे भगिनींची विश्वविक्रमाला गवसणी

हे वाचलंत का?

Back to top button