पुणे : भाजप नगसेवक धनराज घोगरेंसह ७ जणांवर दुसरा गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : भाजप नगसेवक धनराज घोगरेंसह ७ जणांवर दुसरा गुन्हा दाखल

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह सात जणांच्या विरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी भाजप नगरसेवक घोगरे यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात पैसे परत मागण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल आहे. त्यानंतर दत्तवाडी पोलिस ठाण्यात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तक्रारदाराला धमकावून त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्याची धमकी देत घोगरे यांच्या जामिनासाठी ॲफिडेव्हीटवर सह्या घेतल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज घोगरे, सुरेश तेलंग (दोघे, रा. हेवन पार्क, वानवडी), विनोद माने पाटील, ( रा. रावनवाडी, वानवडी), सदा ढावरे, ॲड. अतूल पाटील व त्यांच्या ऑफिसमधील इतर दोघे अशा सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निखील रत्नाकर दिवसे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेतील कामे मिळवून देतो, असे सांगून घोगरे यांनी फिर्यादी ठेकेदाराकडून तीन लाख रुपये घेतले. दरम्यान पैसे घेऊनही काम दिले नाही.

ठेकेदाराला शिवीगाळ मारहाण आरोपाखाली घोगरे आणि साथीदारांवर गुन्हा दाखल

त्यामुळे पैसे परत मागण्यासाठी आलेल्या संबंधीत ठेकेदाराला शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपाखाली घोगरे व त्यांच्या इतर साथीदारांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

त्याच कारणातून सदा ढावरे याने फिर्यादीना त्याच्या पर्वती दर्शन परिसरातील घराजवळ फोन करून बोलवले होते. त्यानंतर त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वकील अतुल पाटील यांच्या कार्यालयात घेऊन गेले. अगोदरच तयार करून ठेवलेल्या ॲफिडेव्हीटवर फिर्यादीच्या सह्या घेतल्या.

घोगरे यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी फिर्यादी यांच्या सह्या घेतलेले ॲफिडेव्हीट व त्यांना दमदाटी करून शिवाजीनगर कोर्टात नेण्यात आले.

तिथे गेल्यानंतर फिर्यादी यांनी कोर्टातील नाझर यांना ते ॲफिडेव्हीट माझे नसून, मला व कुटुंबियांना संपवण्याची धमकी देऊन हे ॲफिडेव्हीट जबरदस्तीने करून घेतल्याचे सांगितले. लघवीचा बहाणा करून फिर्यादीने तेथून पळ काढला होता. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

Back to top button