धुळे : जमिनीचा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी; तलाठ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : जमिनीचा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी; तलाठ्यावर गुन्हा दाखल

धुळे ; पुढारी वृत्तसेवा :

नागपूर-सुरत महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा उतारा व अन्य कागदपत्र देण्यासाठी 3 हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास धुळ्याच्या लाच लुचपत विभागाने गजाआड केले आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, नागपूर-सुरत महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी साक्री तालुक्यातील दहिवेल येथील एका शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती.

या जमिनीच्या मोबदल्यात शासनस्तरावरून त्यांना नुकसान भरपाईची काही रक्कम मिळाली होती. मात्र ही रक्कम त्यांना मान्य नसल्याने त्यांनी न्यायालयात दावा केला होता. या दरम्यान तक्रारदार शेतकऱ्याचे निधन झाले. यामुळे त्यांच्या वकिलाच्या सल्ल्याने न्यायालयात तक्रारदार म्हणून मृत शेतकऱ्याच्या मुलांना वारस लावण्यासाठी अर्ज केला होता.

यासाठी वारस अहवाल व या जमिनीचा सातबारा उतारा आणि अन्य कागदपत्र यांची मागणी मृत शेतकऱ्याच्या मुलाने तलाठी कार्यालयात केली. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याचा मुलगा दहिवेल येथील तलाठी कार्यालयात गेला. यावेळी तलाठी तानाजी वाजे यांनी या  कागदपत्रांसाठी त्याच्याकडून सात हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती त्याने तीन हजार रुपये देण्याचे सुचवले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे या तक्रारदार शेतकऱ्यांनी धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांना तक्रार केली.

त्यानुसार कुराडे यांनी दोन पंचांना पाठवून पडताळणी केली असता, वाजे यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्यामुळे कारवाईसाठी सापळा लावण्यात आला. पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण आणि प्रकाश झोडगे यांच्यासह पथकाने सापळा लावला.

यावेळी तक्रारदार शेतकऱ्याकडून पैसे घेताच वाजे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Back to top button