जिवंत बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूची सर्वात स्पष्ट प्रतिमा | पुढारी

जिवंत बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूची सर्वात स्पष्ट प्रतिमा

लंडन : वैज्ञानिकांनी जिवंत बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूची सर्वात स्पष्ट प्रतिमा सादर केली आहे. या प्रतिमेत दिसणारा जीवाणू ‘ग्राम-निगेटिव्ह’ आहे. त्यामध्ये जीवाणूच्या बाह्य कठीण स्तराला पाहता येऊ शकते. हेच आवरण औषधांनी नष्ट करणे आता कठीण बनत चालले आहे.

इंग्लंडमधील संशोधकांनी या जीवाणूचे छायाचित्र टिपले आहे. जीवाणूचे प्रोटिनपासून बनलेले बाह्य आवरण अतिशय दाट आहे. या प्रतिमेमुळे अनेक अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यामुळे हळूहळू निष्क्रिय होत चाललेल्या अँटिबायोटिक्सच्या समस्येवर उपाय शोधला जाऊ शकेल. जीवाणूच्या पृष्ठभागावर बनलेल्या छिद्रांच्या मदतीने त्यामध्ये पोषक घटक जातात आणि विषारी घटक बाहेर पडतात.

संशोधकांचे म्हणणे आहे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया अँटिबायोटिक्सचा स्वतःवरील परिणाम रोखतात. त्यासाठी त्याचे बाह्य आवरणच ढालीसारखे काम करते. ते इतके मजबूत आहे की अँटिबायोटिक्स औषधांनी तोडले जाणे कठीण असते. त्यामुळे ही औषधे या बॅक्टेरियावर कुचकामी ठरतात. याशिवाय साल्मोनेला आणि ई-कोली बॅक्टेरियाच्या बदलत्या स्वरूपामुळेही त्यांच्यावर अशी औषधे काम करीत नाहीत.

अशाप्रकारे बॅक्टेरिया किंवा जीवाणू आता ‘अँटिबायोटिक रेझिस्टंट’ म्हणजेच ‘अँटिबायोटिक औषधांना न जुमानणारे’ बनत आहेत. आता या नव्या संशोधनातून यावरील उपाय शोधता येऊ शकतो. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे संशोधक बार्ट हुगेनबूम यांनी सांगितले की जिवंत बॅक्टेरिया चे हे छायाचित्र अ‍ॅटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपीने घेण्यात आले आहे.

Back to top button