Chandrayaan-3 माेहिमेची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Chandrayaan-3 माेहिमेची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये, जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) भारताच्या ऐतिहासिक चांद्र मोहिमेची तारीख अधिकृतरित्या घोषित केली आहे. चांद्रयान-३  मोहिमेसाठी LVM-III हे प्रक्षेपण वाहन सज्ज झाले असून, शुक्रवारी (दि.14 जुलै) भारतीय वेळेनुसार दुपारी 2:35 वाजता या मोहिमेला सुरूवात होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-३चे प्रक्षेपण (Chandrayaan-3) होणार आहे.

भारताच्‍या चांद्रयान माेहिमेचा तिसरा टप्‍पा

भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचा हा तिसरा टप्पा आहे. यापूर्वी २२ ऑक्टोबर २००८ राेजी चांद्रयान-१ माेहिम राबविण्‍यात आली. ती यशस्वी ठरली हाेती. यानंतर २२ जुलै  २०१९ रोजी दुसऱ्या चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले; परंतु यामधील लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर भारताचा हा दुसरा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर काही महत्त्वाचे बदल करून चांद्रयान-३ मोहिमेत लँडर-रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेलचा यामध्ये वापर करण्यात आला असून, यामुळे चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्टावर अलगदपणे उतरण्यास मदत होणार आहे, असा विश्वास शास्त्रज्ञांनी (Chandrayaan-3) व्‍यक्‍त केला आहे.

Chandrayaan-3: काय आहे चांद्रयान-३ चे वैशिष्ट्य

चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान प्रक्षेपण करण्याचा भारताचा हा तिसरा प्रयत्न आहे. या माेहिमत सॉफ्ट लँडिंग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य असेल. कारण आत्तापर्यंत केवळ तीन देशांनी वायु, हवेविना असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळयान यशस्वीरित्या उतरवले आहे. भारताने यापूर्वी चंद्रयान-2 मोहिमेतही यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता; पण विक्रम लँडर अलगद उतरण्याऐवजी चंद्रावर कोसळले होता. त्या अपयशातून धडा घेत चंद्रयान-3 मध्ये व्‍यापक बदल करून या माेहिमेत  लँडर-रोव्हरबराेबर प्रोपल्शन मॉडेलचा देखील समावेश करण्यात आला आहे.

काय आहे सॉफ्ट लँडिंग?

जेव्हा एखादे यान कोणत्याही अडथळ्याविना,क्रॅश न होता, प्रयत्नपूर्वक चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे उतरते, तेव्हाच त्याला ‘सॉफ्ट लँडिंग’ झाले असे म्हटलं जाते. दरम्यान, चांद्रयान-३ मध्ये मून लँडर ‘विक्रम’ हा त्याच्या परिभ्रमण केंद्रापासून वेगळा करण्यात आला आहे. तसेच याची उंची कमी करण्यासाठी आणि खाली बेसला स्पर्श करण्यासाठी दोन युक्त्या देखील या मोहिमेत नव्याने वापरण्यात आल्या आहे. तसेच स्वदेशी लँडर, रोव्हरसह प्रोपल्शन मॉड्यूलचा देखील समावेश आहे.

चांद्रयान-३ : यावेळी वेगळे काय?

चांद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल (LM), प्रोपल्शन मॉड्यूल (PM) आणि आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित आणि प्रात्यक्षिक करण्याच्या उद्देशाने एक रोव्हर समाविष्ट आहे. तसेच या मोहिमेत अंतराळयानामधील लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ट भागावर सॉफ्टपणे (अलगद) लँड होण्याची क्षमता असणार आहे. यामध्ये असलेले रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरच्या हालचालींचे विश्लेषण करेल. प्रोपल्शन मॉड्यूल लँडरला चंद्राच्या १०० किमी वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेत घेऊन जाईल अन् कक्षेत भ्रमण करत राहील, असेही इस्त्रोने स्पष्ट केले आहे.

प्रक्षेपणादरम्यान घेतली जाणार ही खबरदारी

चांद्रयान-3 अंतराळयान सुरक्षितपणे उड्डाण करेपर्यंत प्रक्षेपण स्थळाच्या आजूबाजूला सुरू असलेले रस्ते बांधकाम आणि खोदकाम या कामांवर बंदी घालण्यात आली आहे; परंतु तामिळनाडूच्या दूरसंचार विभागाने सर्व दळणवळण मार्ग खुले राहतील, असे स्पष्ट केले आहे.

सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रायलचे यान कोसळले

11 एप्रिल रोजी इस्रायलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला. इस्त्रायली यानाला मात्र लँडिंग करताना अडचणी आल्या आणि चंद्रावर ते कोसळले. इस्रायलने केलेल्या प्रयत्नांमध्ये चंद्रावर यान लॅडिंग होत असतानाच अवघ्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये इंजिनमध्ये बिघाड झाला अन् त्यांचा चंद्रावर उतरविण्‍यात अपयशी ठरले हाेते.

चांद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यास सक्षम- एस सोमनाथ

चांद्रयान-3 प्रक्षेपणाच्या आधी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी आज (दि.१० :) माध्यमांशी बोलताना सांगितले  की, चांद्रयान-३ हे अंतराळयान “चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यास सक्षम असेल. चांद्रयानाच्या या तिसऱ्या टप्प्यात त्याच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आली असून, लक्षणीय बदल देखील करण्यात आले आहेत. चांद्रयान-3 च्या तंत्रज्ञानाने या वेळी यशस्वी सॉफ्ट लँडिंग प्राप्त केले याची खात्री करण्यासाठी त्याच्या डिझाइनमध्ये सुधारणा केली. काही लक्षणीय बदल आहेत, असेही इस्रोच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button