बहुउद्देशीय ‘चांद्रयान-3’ मोहीम

बहुउद्देशीय ‘चांद्रयान-3’ मोहीम

भारत बहुउद्देशीय 'चांद्रयान-3' मोहिमेसाठी सज्ज असल्याचे अलीकडेच 'इस्रो'ने जाहीर केले. 'चांद्रयान-2' मोहिमेच्या अपयशापासून धडा शिकत नव्या मोहिमेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्र, चंद्राची स्थिती आणि वातावरणाची अचूक व महत्त्वाची माहिती मिळेल, असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांना आहे.

पृथ्वीपासून कोसो दूर आकाशात असणार्‍या चंद्राविषयी मानवी मनाला अनेक वर्षांपासून आकर्षण आणि अप्रूप वाटत आले आहे. कालोघात भारतानेही चांद्रमोहिमा राबवल्या. आता 'चांद्रयान-3'ची पेलोड यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर येथे शेवटची जुळवणी सुरू आहे. याचाच अर्थ चंद्रावर रवाना होण्यापूर्वीची तयारी पूर्णत्वास आली आहे, असे म्हणता येईल. अनेक प्रकारच्या काटेकोर चाचण्यांनंतर भारतीय संशोधक आता शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे लाँचपॅडमधून चंद्राच्या दिशेने झेपावणे. या उड्डाणाची तारीख जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातील असू शकतेे. 'चांद्रयान-2' मोहिमेला शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना अपयश आले. त्यामुळे 'चांद्रयान-3'चे प्रक्षेपण सर्वार्थाने महत्त्वाचे आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष या मिशनकडे असणार आहे.

'चांद्रयान-3'साठी संकल्पना आणि उद्देश निश्चित करण्यात आले असून, या अभियानातून त्यांची पूर्तता केली जाणार आहे. अशाप्रकारची अपेक्षा बाळगण्यामागे अनेक कारणे आहेत. एक तर 'चांद्रयान-2'च्या अपयशाने मिळालेला धडा, दुसरे म्हणजे 'चांद्रयान-3'मध्ये 'चांद्रयान-2'च्या पार्श्वभूमीवर केलेले महत्त्वाचे बदल, नवीन अत्याधुनिक उपकरणांची रचना, तिसरे म्हणजे 'चांद्रयान-3'च्या प्राथमिक टप्प्यांतील सर्व चाचण्यांत आलेले समाधानकारक यश आणि शेवटी उपग्रह सोडण्याच्या बाबतीत जागतिक पातळीवर 'इस्रो'चा निर्माण झालेला दबदबा व महाबली म्हणजे सर्वाधिक वजनदार प्रक्षेपक 'जीएसएलएव्ही एम.के-3'ची प्रक्षेपण करण्याची क्षमता.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देशांत चांद्रमोहिमांबाबत स्पर्धा लागली आहे. यापैकी अनेकांचा उद्देश हा शास्त्रीय नसून, व्यावसायिक आहे. चंद्रावरचे पर्यटन, चंद्रावर वास्तव्य करणे, उत्खनन करणे यासारखे अनेक उद्देश आहेत. परंतु, भारत या उद्देशाने चंद्राला गवसणी घालणार नाहीये. आपला उद्देश मानवतावादी आहे. विज्ञान आणि मानवी सेवेच्या द़ृष्टीने भारताने ही मोहीम आखली आहे. प्रामुख्याने चांद्रविज्ञान या संकल्पनेवर आधारित ही मोहिम आहे.

अर्थात, 'चांद्रयान-2' लँडिंगच्या तयारीत असताना अपयशाची लागलेली ठेच ही अनेक शास्त्रज्ञांची मन दुखावणारी ठरली. तो दिवस कदाचित सर्वांनाच आठवत असेल. 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरण्यासाठी काही सेकंद बाकी होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना चांद्रयानाचा पृथ्वीवर असलेल्या स्थानकांशी संपर्क तुटला. लँडिंगपूर्वी लँडरच्या वेगाला नियंत्रित करता आले नाही आणि यान कोसळले. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीनदेखील चंद्राच्या दक्षिण धु्रवावर जाऊ शकले नाहीत.

'चांद्रयान-2' मोहीम यशस्वी झाली असती, तर चंद्राच्या दक्षिण धु्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता; पण या यशापासून आपण काही पावले वंचित राहिलो. या अपयशाने आपल्याला लँडरच्या गतीवरचे नियंत्रण, वजनासंबंधीचे अनेक तांत्रिक धडे मिळाले. त्यानंतर लँडरचे पाय चांगल्या तंत्रज्ञानाने आणखी विकसित करता येऊ शकतात, हे लक्षात आले. यंदाच्या मोहिमेमध्ये 'चांद्रयान-2'प्रमाणे कटू अनुभव येणार नाहीत, असा विश्वास आहे. कारण, इस्रोने गेल्या वेळचा धडा घेत 'चांद्रयान-3'मध्ये अनेक बदल केले आहेत. लँडरचे वजन कमी करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न करताना त्यातील एक इंजिन कमी करण्यात आले आहे.

'चांद्रयान-2'चे लँडर 'विक्रम' यात एकूण पाच इंजिन होती. 'चांद्रयान-3'मध्ये चारच इंजिन आहेत. 'चांद्रयान-2'मध्ये दोन्ही बाजूंनी दोन इंजिनबरोबर एक इंजिन बसविलेले होते आणि ते आता वगळण्यात आले आहे. याशिवाय लँडरच्या पायाच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्याच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागावर सहजपणे उतरता येईल आणि तो मजबुतीने उभा राहील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लँडरमध्ये अत्याधुनिक प्रकारचे 'लँडर डॉप्लर वलोसीमीटर' बसवण्यात आले आहे. यावरून त्याच्या चालीचे बारकाईने आकलन करणे आणि त्याच्या गतीवर सहजपणे नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. या बदलामुळे अभियानाचा खर्च हा सव्वासहा हजार कोटींवरून 9 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, त्यापासून मिळणार्‍या लाभाच्या तुलनेत हा खर्च अधिक नाही, असे म्हणता येईल.

आणखी एक गोष्ट म्हणजे, यावेळी 'चांद्रयान-3'बरोबर लँडर आणि रोवर आहेतच; परंतु ऑर्बिटर नसेल. 'चांद्रयान-2'चा ऑर्बिटर अजूनही चंद्राभोवती फिरत असून, तो 'चांद्रयान-3'साठी कामाला येईल. त्याच्याकडे 'चांद्रयान-3'च्या कामकाजासाठी पुरेसा वेळ आहे. 'चांद्रयान-3'च्या प्रक्षेपणापूर्वी सर्व चाचण्या करण्यात आल्या आणि त्या समधानकारक आहेत. मात्र, ऐनवेळी ही मोहीम अपयशी ठरली. या अपयशावरून अनेक मुद्दे चर्चेला आले. ज्या उंचीपासून लँडरला वेगळे होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायचे होते, त्याची चाचणी योग्य वातावरणात आणि संपूर्ण तांत्रिक कौशल्याने झालेली नसल्याचे सांगितले गेले.

यंदा असे काहीच घडणार नाही. पेलोडच्या अंतिम असेम्ब्लीत जाण्यापूर्वी 'इस्रो'ने सर्व चाचण्या वेळेत पूर्ण केल्या आहेत. मोहिमेच्या अगोदर यावेळी अधिक ताफा होताच आणि वेळही दिला गेला. टेस्ट डेटाचे विश्लेषण, फ्लाईट ऑपरेशनसाठी आवश्यक असणारे हार्डवेअर योग्यरीतीने काम करत आहे. त्याला दुजोरा देणार्‍या सर्व सिस्टीमच्या कामगिरीची बारकाईने तपासणी करणारा फ्लाईट एक्सेप्टन्स हॉट टेस्ट सुस्थितीत आहे. इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंटरफेस, इलेक्ट्रो मॅग्नेटिक कॅम्पॅटिबिलिटी टेस्ट, लाँचच्या वेळी होणारे भीषण कंपन, प्रचंड ध्वनी या परिस्थितीत यान स्थिर होण्याच्या क्षमतेचा विषय असो किंवा इंजिन ट्यून करण्याचे काम असो, या सर्व गोष्टींची पडताळणी झाली आहे.

मोहिमेदरम्यान रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच आर. एफ. कम्युनिकेशन लिंक कायम राहील तसेच ऑर्बिटर, लँडर आणि रोवर हे सतत संपर्कात राहतील, याची दक्षता घेतली जात आहे. एवढेच नाही, तर एक अतिरिक्त प्रायोगिक उपकरण चंद्राच्या कक्षेपासून ते पृथ्वीच्या कक्षेपर्यंत स्पेक्ट्रो धु्रवीयमितीय परिणामाचे आकलन करणार आहे. त्याचीही चाचणी करण्यात आली असून, आणखी चांगले एल्गोरिदम तयार करण्याबरोबरच त्याच्या अपयशाच्या वेळी काय करावे लागेल, या सर्व गोष्टींचे आकलन केले आहे. लँडर आणि रोवरला अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणे बसविली आहेत. आता केवळ प्रक्षेपणाची वाट पाहिली जात आहे. आजमितीला सर्व चाचण्या आणि परीक्षणाचे आकलन केल्यास एखादी दुर्दैवी घटना घडली नाही, तर 'चांद्रयान-3' चंद्राच्या दक्षिण धु्रवावर अचूक लँडिंग करत आपला प्राथमिक उद्देश साध्य करेल.

एका समतल ठिकाणावर उतरणारे लँडर, चार पायाचे रोव्हर, त्यासोबत असणारी वैज्ञानिक उपकरणे ही लँडिंगच्या ठिकाणी असलेल्या खडकाळ पृष्ठभागावर असलेला थर, त्याचा प्लाझ्मा, रासायनिक विश्लेषण, मौलिक रचनेच्या थर्मल फिजिकल गुणधर्मांबाबतची महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतील… अब्जावधी वर्षांपासून सूर्याच्या किरणांपासून वंचित राहिलेल्या दक्षिण धु्रवावर क्रेटर बर्फ मिळण्याच्या शक्यतेची पडताळणी केली जाणार आहे. सौरमंडळातून जन्मणार्‍या नवीन पुराव्याचा शोध घेतला जाईल. 'नासा' 2025 मध्ये आर्टेमिसच्या तीन कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच अन्य अंतरिक्ष संस्था आणि खासगी कंपन्या या चंद्राच्या दक्षिण धु्रवावर मानव पाठवून तेथे वस्ती शक्य आहे का? याची पडताळणी करण्याची शक्यता आहे; पण 'चांद्रयान-3' हे त्यांच्या मोहिमांच्या अगोदरच सर्व माहिती गोळा करेल, अशी अपेक्षा करू.

श्रीनिवास औंधकर,
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news